२६/११ शी संबंधित बाँबतज्ज्ञाला आॅस्ट्रियात अटक
By admin | Published: April 11, 2016 02:36 AM2016-04-11T02:36:52+5:302016-04-11T02:36:52+5:30
युरोपमध्ये हिंसाचार घडविण्यासाठी युरोपियन युनियनमध्ये निर्वासित असल्याचे भासवून इस्लामिक स्टेटचे (आयएस) सदस्य बनलेल्यांमध्ये एक बाँब बनविणाऱ्या पाकिस्तानी तज्ज्ञाचाही समावेश आहे
लंडन : युरोपमध्ये हिंसाचार घडविण्यासाठी युरोपियन युनियनमध्ये निर्वासित असल्याचे भासवून इस्लामिक स्टेटचे (आयएस) सदस्य बनलेल्यांमध्ये एक बाँब बनविणाऱ्या पाकिस्तानी तज्ज्ञाचाही समावेश आहे. हा तज्ज्ञ मुंबई हल्ल्याशी (२६/११) संबंधित होता, असे वृत्त रविवारी ‘संडे टाइम्स’ने दिले.
मुहम्मद उस्मान घनी (३४) हा दहशतवादी गट ‘लष्कर ए तोयबा’ आणि ‘लष्कर ए झांगवी’ यांच्याशी संबंधित होता. त्याला दहशतवादी संघटनांमध्ये भाग घेतल्याच्या आरोपांवरून आॅस्ट्रियामध्ये ताब्यात घेण्यात आले, असे वृत्तात म्हटले आहे.
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाने (इसिस) गेल्या नोव्हेंबरच्या आधी युरोपमध्ये ‘हल्ला करणारी तुकडी’ पाठविली होती, तीत उस्मानचा समावेश होता. मुंबई हल्ला लष्कर ए तोयबाने घडविला होता व त्यात १६६ जण ठार झाले होते. अनेक देशांच्या पातळीवर सुरू असलेल्या चौकशीतून उस्मानची माहिती समोर आली आहे. ब्रिटनसह युरोपियन देशांवर आणखी ‘मोठ्या प्रमाणावरील’ हल्ले होऊ घातले असल्याचा इशारा चौकशी यंत्रणेच्या सूत्रांनी दिला आहे. इसिसचे कित्येक डझन दहशतवादी अजूनही फरार आहेत, असे वृत्तात म्हटले आहे. उस्मान घनी आणि इसिसचा अल्जेरियन संशयित दहशतवादी अदेल हद्दादी (२८) यांची आॅस्ट्रिया आणि फ्रेंचच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत १३० जण ठार झाले होते. या दहशतवादी गटाशी या दोघांचा संबंध असल्याबद्दल ही चौकशी झाली. इसिसच्या अज्ञात अशा ‘हल्लेखोर तुकड्या’ असून तिचे हे दोघे भाग असावेत. गेल्या वर्षी युरोपमध्ये स्थलांतरितांच्या घोळक्यातून या हल्लेखोर तुकड्यांनी शिरकाव केला आहे. युरोप खंडात जिहादींचे जे जाळे पसरले आहे त्याने या दहशतवाद्यांना बनावट ओळखपत्रांच्या दस्तावेजासह सुरक्षित निवासस्थान व अन्य आवश्यक मदत पुरविली. उस्मान आणि हद्दादी हे तीन आॅक्टोबर रोजी ग्रीकच्या लिरोज बेटावर बोटीने आले. पॅरिसमध्ये दोन आत्मघाती हल्लेखोर ज्या बोटीतून आले त्याच बोटीतून उस्मान व हद्दादी आले होते.