जगभरात २७ लाख; अमेरिकेत ८ लाख रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 05:48 AM2022-01-09T05:48:22+5:302022-01-09T05:48:33+5:30
गत २४ तासांत झपाट्याने वाढले बाधित
न्यूयॉर्क : काेराेनाच्या तिसऱ्या लाटेत जगभरात गेल्या आठवडाभरात जवळपास पाचपटीने रुग्ण रुग्ण वाढले आहेत. गेल्या २४ तासामध्ये जगात २६.९६ लाख नव्या काेराेनाबाधितांची नाेंद झाली असून, ६ हजार ३६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये सर्वाधिक ८.४९ लाख नवे बाधित आढळले आहेत. त्यापाठाेपाठ फ्रान्समध्ये ३.२८ लाख, ब्रिटनमध्ये १.७८ लाख, स्पेनमध्ये १.१५ लाख, अर्जेंटिनामध्ये १.१० आणि इटलीमध्ये १.०८ लाख बाधितांची नाेंद झाली आहे. फ्रान्समध्ये सहापटींनी रुग्णवाढ झाली असून, तेथील परिस्थिती गंभीर झाली आहे.
अमेरिकेत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी
अमेरिकेत दरराेज ७ लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे तेथील आराेग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. कर्मचाऱ्यांना संसर्ग हाेत असल्याने पाेलीस, अग्निशमन दल, बसचालक आदी सार्वजनिक सेवांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे लाेकांपर्यंत आवश्यक सेवा कशा पाेहाेचवाव्या, असा प्रश्न सरकारसमाेर निर्माण झाला आहे. बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे अनेक ठिकाणी टेस्टींग किटचा तुटवडा निर्माण झाला आहे.
नियमांचे कठाेर पालन आवश्यक - जागतिक आराेग्य संघटना
या साथीवर नियंत्रण आणायचे असल्यास सार्वजनिक आराेग्य आणि काेराेना नियमावलींचे कठाेर पालन करणे आवश्यक असल्याचे जागतिक आराेग्य संघटनेने म्हटले आहे. संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियाच्या विभागीय संचालक डाॅ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितले, की ओमायक्राॅन कमी तीव्र असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याचा संसर्ग साैम्य असल्याचे गृहीत धरण्याची चूक करायला नकाे.