अमेरिकेत २७% लोकांचा फलज्योतिषावर विश्वास!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 07:54 AM2023-07-29T07:54:51+5:302023-07-29T07:55:14+5:30
नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एखाद्या गोष्टीकडे जो ज्या नजरेनं पाहील, त्याप्रमाणेच ती गोष्ट त्याला वाटत असते.
नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एखाद्या गोष्टीकडे जो ज्या नजरेनं पाहील, त्याप्रमाणेच ती गोष्ट त्याला वाटत असते. म्हटलं तर ‘हत्ती आणि सात आंधळे’ यांच्या गोष्टीप्रमाणेच. हीच बाब ‘ज्योतिष’ याबाबतीतही आहे. काहींना त्याबाबत शंका असते, अविश्वास असतो, तर काही जणांचा ठाम विश्वास. आकाशातील ग्रह-तारे आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर परिणाम करतात असं जगातल्या बहुतेक सगळ्या संस्कृतींमध्ये सांगितलं गेलं आहे. अर्थातच याबाबत मत-मतांतरं आहेत आणि आधुनिक विज्ञान तर विज्ञानाच्या साऱ्या कसोट्या पार पाडल्यानंतरच एखाद्या गोष्टीबाबतची सत्यता मान्य करतं. अर्थात सत्य हेदेखील सापेक्ष आहेच.
पण, प्रश्न असा आहे, की गुहेत आणि जंगलात राहणाऱ्या माणसाला जसं वाटायचं की ग्रह-ताऱ्यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो, तसं आजच्या आधुनिक मानवाला वाटतं का? त्यातही जगातल्या सगळ्यात आधुनिक देशातल्या, अमेरिकेतल्या माणसांना फलज्योतिष याबद्दल काय वाटतं? यूगोव्ह नावाच्या एका संस्थेने नुकतंच अमेरिकेत एक सर्वेक्षण केलं. त्यात असं आढळलं की अमेरिकेतील २७ टक्के, म्हणजे दर चौघांपेकी एकाचा फलज्योतिषावर विश्वास आहे. म्हणजेच त्यांना असं वाटतं, की आकाशातील ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीचा मानवी आयुष्यावर परिणाम होतो.
यात तरुण किती, मध्यमवयीन किती आणि वृद्ध किती? त्यातही ३० वर्षांखालील किती तरुणांचा यावर विश्वास आहे असं बघितलं तर दिसतं की, ३० वर्षांखालील ३७ टक्के तरुणांचा फलज्योतिषावर विश्वास आहे. ६५ वर्षांवरील व्यक्तींना जेव्हा हाच प्रश्न विचारला तेव्हा त्यापैकी फक्त १६ टक्के लोकांनी सांगितलं की त्यांचा ग्रह-ताऱ्यांवर विश्वास आहे. ज्योतिषावरही त्यांचा विश्वास आहे. पण, म्हणजे आम्ही आमची सगळी, दैनंदिन कामं ज्योतिष पाहून करतो असं नाही, असंही त्यांनी सांगितलं. तरुण मुलांचाही ज्योतिषावर विश्वास आहे, त्यात नक्कीच काही तरी तथ्य आहे, असं त्यांना वाटतं, पण प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही दैवावर अवलंबून राहत नाही, आमच्या कर्तृत्वावरही आमचा भरवसा आहे, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
यासंदर्भात अनेक चाचण्याही घेण्यात आल्या. काही संदर्भ तपासण्यात आले. या आकडेवारीत शिक्षणाने काही फार फरक पडतो का? तर तसा काही फरक दिसत नाही. माध्यमिक शिक्षण झालेले आणि पदवीपर्यंत शिकलेले यांच्या आकडेवारीत फार फरक नाही. त्यामानाने उच्चशिक्षण घेतलेल्यांमध्ये फलज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्यांचं प्रमाण काहीसं कमी दिसून आलं. जे लोक जास्त धार्मिक आहेत, त्यांच्यामध्ये फलज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तर निधर्मी लोकांमध्ये ही संख्या १० टक्के इतकी कमी आहे.
फलज्योतिषावर विश्वास आहे, तर मग तुमची रास तुम्हाला माहिती आहे का, असं विचारून जर का १२ राशींची नावं अमेरिकन लोकांना सांगितली, तर ९० टक्के लोकांना त्यांची रास कुठली हे माहिती होतं. केवळ १० टक्के लोकांना त्यांची रास कुठली आहे याबद्दल खात्री नव्हती.
इतक्या मोठ्या प्रमाणात अमेरिकन लोकांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे, पण इतरांनीही, विशेषत: आपला नेता, राजकीय पुढारीही तसाच असावा असं त्यांना वाटतं का? ‘तुम्हाला फलज्योतिषावर विश्वास ठेवणारा राजकीय उमेदवार अधिक विश्वासार्ह वाटतो की कमी’, असा प्रश्न ज्यांचा ज्योतिषावर विश्वास आहे अशांना आणि ज्यांचा विश्वास नाही अशांनाही या सर्वेक्षणात विचारला गेला. त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी ४० टक्के लोकांनी सांगितलं की, उमेदवाराचा ग्रह-ताऱ्यांवर विश्वास आहे की नाही याने त्यांना काही फरक पडत नाही, ७ टक्के लोकांनी सांगितलं की त्यामुळे तो उमेदवार त्यांना जास्त विश्वासार्ह वाटेल, तर ३४ टक्के लोक म्हणाले की, असा विश्वास ठेवणाऱ्या उमेदवाराला आम्ही मत देण्याची शक्यता कमी आहे. स्वतः ज्योतिषावर विश्वास न ठेवणाऱ्या ४६ टक्के लोकांचं म्हणणं होतं, की असा विश्वास ठेवणाऱ्या उमेदवाराला त्यांनी मत देण्याची शक्यता कमी आहे.
मनगटावरही आमचा विश्वास!
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या या सर्वेक्षणात प्रत्येक गटाला प्रतिनिधित्व मिळेल याची काळजी घेण्यात आली. त्यामध्ये वयोगट, लिंग, वंश, शिक्षण, भौगोलिक ठिकाण आणि राजकीय पक्ष किंवा विचारधारा या सगळ्यांना समान प्रतिनिधित्व मिळेल याची काळजी घेण्यात आली होती. या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या अनेकांनी सांगितलं, ज्योतिषावर आमचा विश्वास आहे, पण आमच्या मनगटालाही आम्ही कमी लेखत नाही. दोन्ही गोष्टी आम्ही बरोबरीनं करतो.