Indonesia Tsunami Update: इंडोनेशियामध्ये त्सुनामीचा हाहाकार, 281 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 08:35 AM2018-12-24T08:35:13+5:302018-12-24T08:45:57+5:30
इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर उसळलेल्या त्सुनामीचा हाहाकार पाहायला मिळाला आहे. या त्सुनामीमध्ये आतापर्यंत 281 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1000हून अधिक जण जखमी आहेत.
जकार्ता - इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर उसळलेल्या त्सुनामीचा हाहाकार पाहायला मिळाला आहे. या त्सुनामीमध्ये आतापर्यंत 281 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1000हून अधिक जण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर ही त्सुनामी आल्याची माहिती इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जावाचा दक्षिणी भाग आणि दक्षिणी सुमात्राच्या किनाऱ्यावरील आलेल्या या त्सुनामीने शेकडो इमारती कोसळल्या आहेत. ही त्सुनामी स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री 9.30 वाजता आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते सुतोपो पूर्वो नुग्रोहो यांनी दिली आहे.
त्सुनामीमध्ये आतापर्यंत 281 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100हून अधिक लोक जखमी आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने समुद्राच्या आत भूस्खलन झाले आणि लाटा मोठ्या प्रमाणात उसळल्या. त्यानंतर या लाटांनी त्सुनामीचे स्वरूप धारण केले. इंडोनेशियातील भूवैज्ञानिकांनी या त्सुनामीच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही नुग्रोहो यांनी व्यक्त केली आहे. अनक क्रॅकटो हे छोटं ज्वालामुखीचे बेट आहे. 1883मध्ये क्रॅकटो ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे हे बेट अस्तित्वात आले.
The death toll from a volcano-triggered #tsunami in #Indonesia has risen to 281, with more than 1,000 people injured, reports AFP (file pic) pic.twitter.com/71DB086erU
— ANI (@ANI) December 24, 2018
इंडोनेशियाला याआधीही बसला होता त्सुनामीचा फटका
काही दिवसांपूर्वी इंडोनेशियाला अशाच भूकंपाचा जोरदार धक्का बसून त्यापाठोपाठ त्सुनामी आली होती. त्या त्सुनामीमुळे इंडोनेशियामध्ये 1763 जणांचा मृत्यू झाला होता. अनेक लोक बेपत्ता होते. सुलावेसी बेट परिसरात 28 सप्टेंबर रोजी 7.5 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला व त्सुनामीचेही संकट ओढावले. याचा मोठा फटका पालू-पेटोबो व बालारोआ या दोन भागांना बसला. तेथील इमारती कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली कित्येक लोक दबले गेले होते. त्यातील अनेकांची बचावपथकांनी सुखरूप सुटका केली; परंतु तरीही अद्याप पाच हजार जण बेपत्ता होते.
राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पुरवो नुग्रोहो यांनी सांगितले होते की, कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली अद्यापही अडकून पडलेल्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. त्यात ज्या व्यक्तींचा शोध लागणार नाही त्यांना बेपत्ता किंवा मृत म्हणून जाहीर केले जाईल. पालू येथील पेटोबो या गावामध्ये भूकंप-त्सुनामीने खूपच नुकसान झाले होते.