Pakistan: पाकिस्तानात पावसामुळे २८२ जणांचा मृत्यू; २० वर्षांचा रेकॉर्ड तुटला, अनेक भागात बत्ती गुल!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 06:53 PM2022-07-22T18:53:42+5:302022-07-22T18:54:46+5:30
पाकिस्तानात पावसाचे तांडव सुरूच असून पावसाने मागील २० वर्षांचा विक्रम मोडला आहे.
इस्लामाबाद ।
पाकिस्तानात पावसाचे तांडव सुरूच असून पावसाने मागील २० वर्षांचा विक्रम मोडला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत २८२ पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अलीकडेच पाकिस्तानमधील प्रमुख शहर लाहोरमध्ये सलग सात तास पाऊस पडत होता. सततच्या पावसामुळे पाकिस्तानातील नागरी सेवा विस्कळीत झाल्या असून मोठी जिवीतहानी होत आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'ने दिलेल्या वृत्तानुसार, पावसाने मागील २० वर्षांचा विक्रम मोडला आहे, ज्यामध्ये जवळपास २३८ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
वृत्तवाहिनी एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, लाहोरमध्ये गुरूवारी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. अनेक भागातील वीजसेवा खंडित करण्यात आली तर शहरातील काही भागांतील घरांमध्ये पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे रस्ते नदीमय झाले असून वादळी वाऱ्यामुळे शहरातील अर्धा भाग वीजेअभावी अंधारात गेला आहे.
मागील ४ आठवड्यात २८२ लोकांचा मृत्यू
देशाचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मागील चार आठवड्यात पावसामुळे पाकिस्तानातील विविध भागातील तब्बल २८२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय अन्य २११ लोकांचा जखमींमध्ये समावेश आहे.
पावसामुळे शहरांना आले नदीचे रुप
मुसळधार पावसामुळे पाकिस्तानातील अनेक घरं आणि गावं नदीमय झाले आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून उभी पिकं आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. तसेच खराब झालेल्या रस्त्यांमुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. अशी माहिती पाकिस्तानातील न्यूज एजेंसी सिन्हुआने दिली. याआधी पाकिस्तानमधील हवामान विभागाने शुक्रवार ते मंगळवार या कालावधीत प्रांतातील विविध जिल्ह्यांमध्ये अधिक मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते.