गाझावर ३.६ लाख सैन्य हल्ला करणार; १० लाख लोकांना शहर सोडण्याचे इस्रायलचे फर्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 12:37 PM2023-10-14T12:37:55+5:302023-10-14T12:38:59+5:30

उत्तर गाझामधील तब्बल १० लाख लोकांनी २४ तासांत गाझा शहर सोडण्याचे आदेश इस्रायलच्या सैन्याने दिले आहेत.

3-6 million troops to attack Gaza; Israel orders 1 million people to leave the city | गाझावर ३.६ लाख सैन्य हल्ला करणार; १० लाख लोकांना शहर सोडण्याचे इस्रायलचे फर्मान

गाझावर ३.६ लाख सैन्य हल्ला करणार; १० लाख लोकांना शहर सोडण्याचे इस्रायलचे फर्मान

जेरुसलेम : इस्रायलचे ३.६० लाख सैनिक कोणत्याही क्षणी गाझावर हल्ला करण्याच्या तयारीत असून, उत्तर गाझामधील तब्बल १० लाख लोकांनी २४ तासांत गाझा शहर सोडण्याचे आदेश इस्रायलच्या सैन्याने दिले आहेत. संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी ही माहिती दिली. लाखो लोकांना शहर सोडण्यास सांगितल्याच्या या आदेशाचे विनाशकारी परिणाम होण्याची भीती असल्याचे त्यांनी म्हटले. सध्या गाझामध्ये २३ लाख लोक राहतात.

हमासने एका आठवड्यापूर्वी  इस्रायलवर धक्कादायक आणि क्रूर हल्ला केला होता. त्याचा बदला म्हणून इस्रायलने गाझावर  ६ दिवसांत तब्बल ६ हजार बॉम्ब टाकले आहेत. यात अनेक नागरिकांचा मृत्यू होत आहे. अनेकांचे अपहरण सुरू असून, अंदाधुंद हत्या करण्यात येत आहेत. गाझाचा वीज, पाणी, इंधन, औषध पुरवठा रोखण्यात आल्यामुळे ५० हजार गरोदर महिलांना शुद्ध पाणी मिळेनासे झाले आहे. औषध पुरवठा होत नसल्याने अनेक जखमींचे प्राण संकटात आले आहेत. दरम्यान, बीजिंगमधील इस्रायली दूतावासातील एका कर्मचाऱ्यावर भर बाजारपेठेत चाकूने हल्ला करण्यात आला.

इस्रायली हल्ल्यात ७० ठार -
गाझा शहरातून बाहेर पडणाऱ्या लोकांच्या समूहांवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ७० लोक ठार झाले आहेत. यात बहुतेक महिला आणि मुले आहेत, असे हमासच्या मीडिया कार्यालयाने सांगितले.

जगणार असाल तरच...
- लाखो पॅलेस्टिनी लोकांचे घर असलेल्या गाझा शहरातून बाहेर पडण्याचे आदेश आल्यानंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.
- अन्नपाण्यावाचून तडफडत असलेल्या नागरिकांचे लोंढे बाहेर पडतील, अशी भीती व्यक्त होत आहे. अन्नाबाबत विसरा, वीज विसरा, इंधन विसरा. 
- जर तुम्ही जगणार असाल, तरच या गोष्टींचा विचार करा, असे हंबरडा फोडत पॅलेस्टिनी रेड क्रिसेंटच्या प्रवक्त्या नेबल फरसाख म्हणाल्या.

१३ ओलिसांचा मृत्यू 
इस्रायलने गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यात ओलीस ठेवलेल्या १३ इस्रायलींचा मृत्यू झाल्याचे हमासने म्हटले आहे. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हमासने त्यांना ओलिस ठेवले होते.

२७ अमेरिकनांचा मृत्यू
युद्धात किमान २७ अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १४ लोक अद्याप बेपत्ता आहेत. युद्धग्रस्त भागात आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिका चार्टर विमाने पाठविणार असल्याचे व्हाइट हाउसने जाहीर केले. 

आम्ही साऱ्या जगावर राज्य करू : हमास
इस्रायल हे तर आमचे पहिले लक्ष्य आहे. सर्व जगावर आमचे राज्य प्रस्थापित करू, अशी दर्पोक्ती हमास या दहशतवादी संघटनेचा कमांडर महमूद अल् झहर याने केली आहे. या जगात कोणीही कोणावर अन्याय करू नये, असे त्याने म्हटले आहे.

मोठ्या संघर्षाची  वाढती भीती  -
इस्रायलने अलीकडच्या काही दिवसांत लेबनॉनच्या हिजबुल्ला या अतिरेकी गटावरही हल्ला केला.
सध्या येथील सीमेवर शांतता असली, तरी व्यापक संघर्षाची भीती निर्माण झाली आहे. 
जगभरातील अनेक देशांमध्ये मुस्लीम प्रार्थनांमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा निषेध केल्यानंतर जेरुसलेमच्या जुन्या शहरात तणाव वाढला आहे. 

Web Title: 3-6 million troops to attack Gaza; Israel orders 1 million people to leave the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.