हार्वे वादळात ३० जणांचा मृत्यू, लाखभर भारतीय पूरग्रस्त टेक्सासमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 02:54 AM2017-08-31T02:54:57+5:302017-08-31T02:56:00+5:30
अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण वादळ असलेल्या हार्वे वादळामध्ये टेक्सास प्रांतात ३० जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक बेघर झाले आहेत.
ह्युुस्टन : अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण वादळ असलेल्या हार्वे वादळामध्ये टेक्सास प्रांतात ३० जणांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक बेघर झाले आहेत. ह्युस्टन शहरात लुटमार वाढली आहे. त्यामुळे तेथे रात्रीच्या काळी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. जवळपास एक लाख अमेरिकन भारतीय सध्या वादळ आलेल्या टेक्सास प्रांतात राहतात. तेही या वादळात अडकले आहेत.
या वादळाचा लाखो लोकांना तडाखा बसला आहे. मदतकार्य करण्याºया हजारो टीम सध्या रहिवाशांना वाचविण्यासाठी अविरत काम करीत आहेत.
वादळाच्या काळात आलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूर आला असून, येत्या काळातही आणखी मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला
आहे.
शुक्रवारपासून आलेल्या पुरात अनेक जण वाहून गेल्याची भीती आहे. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढू शकते, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. आतापर्यंत १३ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
हार्वे वादळामुळे एका २४ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ह्युस्टन येथे या वादळात आतापर्यंत २०० विद्यार्थी अडकलेले आहेत.
टेक्सासच्या ए अँड एम विश्वविद्यालयात निखिल भाटिया शिकत होता. तो आपल्या मैत्रिणीसोबत शनिवारी ब्रायन तलावात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या मैत्रिणीची प्रकृती गंभीर आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाºयांनी सांगितले की, निखिल भाटियाच्या घरच्यांशी आम्ही संपर्कात आहोत.
तसेच त्याच्या मैत्रिणीला ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, त्यांच्याशीही संपर्क ठेवून होतो. निखिल भाटिया हा मूळचा जयपूरचा आहे, तर त्याची मैत्रीण शालिनी सिंह नवी दिल्ली येथील रहिवासी आहे.