इम्रान खान यांच्या घरात लपले ३० ते ४० दहशतवादी, हल्लेखोरांना ताब्यात द्या अन्यथा...; सरकारचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 09:33 AM2023-05-18T09:33:50+5:302023-05-18T09:34:25+5:30
इम्रान खान यांच्यावर १०० हून अधिक गुन्हे दाखल
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लाहोर येथील निवासस्थानात ३० ते ४० दहशतवादी लपलेले आहेत. त्यांना चोवीस तासांच्या आत आमच्या हवाली करा अन्यथा कडक कारवाईला सामोरे जा, असा इशारा पंजाबमधील हंगामी सरकारने इम्रान खान यांना बुधवारी दिला.
९ मे रोजी इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर काही दहशतवाद्यांनी लाहोर कॉर्प्स कमांडरच्या घरावर व अन्य लष्करी इमारतींवर हल्ला
केला होता. हल्लेखोर लाहोरमधील झमान पार्क येथील निवासस्थानात लपून बसले असल्याची खात्रीलायक माहिती आम्हाला मिळाल्याचा दावा पंजाब सरकारच्या माहिती खात्याचे मंत्री आमीर मीर यांनी केला आहे.
मला पुन्हा अटक होण्याची शक्यता : इम्रान खान
- मला पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. लाहोरमधील माझ्या घराला पोलिसांनी वेढा घातला आहे, असे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.
- उसळलेल्या हिंसाचाराची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. कदाचित, मला पुन्हा अटक होण्याआधीचे हे शेवटचे ट्विटही असू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
इम्रान खान यांच्यावर १०० हून अधिक गुन्हे दाखल
इम्रान खान यांच्यावर गेल्या ९ मेनंतर दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांत त्यांना कोणीही अटक करू नये यासाठीची मुदत इस्लामाबाद उच्च न्यायालयाने ३१ मेपर्यंत वाढविली आहे.
आपल्याला पुन्हा अटक करण्यात येईल अशी शक्यता वाटल्याने इम्रान खान यांनी दिलासा मिळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्या. मियागूल हसन औरंगजेब यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी झाली. त्यावेळी इम्रान खान न्यायालयात उपस्थित नव्हते. इम्रान खान यांच्यावर १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
‘पीटीआय पक्षकार्यकर्त्यांवर जुलूम’
पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ (पीटीआय) या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अवैधरीत्या अटक, तसेच काही ठिकाणी त्यांचे अपहरण करण्यात येत असल्याचा आरोप त्या पक्षाचे प्रमुख व माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. ते म्हणाले की, पीटीआय पक्षाचे उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी आणि महासचिव असद उमर यांना एका आठवड्यापेक्षा जास्त काळ तुरुंगात डांबून ठेवले आहे. आमच्या पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांना सरकार त्रास देत असल्याचा त्यांनी आरोप केला.