दक्षिण सुदानच्या राजधानीत अडकले ३०० भारतीय

By admin | Published: July 13, 2016 02:46 AM2016-07-13T02:46:13+5:302016-07-13T02:46:13+5:30

दक्षिण सुदानमधील यादवीला पुन्हा तोंड फुटल्यामुळे देशाची राजधानी जुबात ३०० हून अधिक भारतीय अडकून पडले आहेत.

300 Indians stuck in southern Sudan capital | दक्षिण सुदानच्या राजधानीत अडकले ३०० भारतीय

दक्षिण सुदानच्या राजधानीत अडकले ३०० भारतीय

Next

जुबा : दक्षिण सुदानमधील यादवीला पुन्हा तोंड फुटल्यामुळे देशाची राजधानी जुबात ३०० हून अधिक भारतीय अडकून पडले आहेत. वांशिक आधारावर फूट पडलेल्या दोन सशस्त्र गटांत गुरुवारपासून लढाई सुरू असून, भारतीयांनी भारतीय दूतावासासह विविध ठिकाणी आश्रय घेतला आहे.
जुबातील भारतीयांची सुटका करण्याची योजना आखण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी टिष्ट्वटरवरून सांगितले. ‘दक्षिण सुदानमधील घडामोडींची मला कल्पना आहे, घाबरू नका. तुमचे नाव भारतीय दूतावासात नोंदवा,’ असे आवाहन त्यांनी सुदानमधील भारतीयांना केले. दुसरीकडे भारतीय दूतावासाने भारतीयांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे.
‘जुबातील सर्व भारतीय सुरक्षित आहेत. तथापि, तुंबळ लढाई सुरू असून, जुबात तोफगोळ्यांचा मारा
होत आहे. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असून, योग्य संधी मिळताच भारतीयांची सुटका केली जाईल. मात्र, सध्या तरी परिस्थिती प्रतिकूल आहे. विमानतळ बंद असून, रस्त्यावर जागोजागी अडथळे निर्माण करण्यात आले आहेत, त्यामुळे तूर्त भारतीयांची सुटका करणे कठीण आहे,’ असे भारताचे दक्षिण सुदानमधील राजदूत श्रीकुमार मेनन यांनी सांगितले.
‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या दक्षिण सुदानमधील शांतता पथकांत २,५०० भारतीय सैनिकांचा समावेश असून, त्यातील १५० सैनिक राजधानी जुबात आहेत. मात्र, त्यांना मदत करणे शक्य नाही,’ असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

अडकून पडलेल्यांत महाराष्ट्र पोलीस दलाच्या ३० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे अधिकारी संयुक्त राष्ट्र शांतता पथकात नेमणुकीला आहेत. पोलीस उपायुक्त शीला सैल यांचा यात समावेश आहे. त्यांच्यासोबत चार कनिष्ठ अधिकारी आहेत.
मुंबई पोलिसांनी याबाबत केंद्राकडून काहीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. तथापि, हे सर्व अधिकारी सुखरूप असल्याचे केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: 300 Indians stuck in southern Sudan capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.