स्विस बँकांमध्ये ३०० कोटी बेवारस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 04:47 AM2018-07-16T04:47:30+5:302018-07-16T04:47:40+5:30
सलग तीन वर्षे कोणतेही व्यवहार न होता निष्क्रिय’ राहिलेल्या ३,५०० खात्यांचा तपशील स्विस बँकांनी याही वर्षी जाहीर केला
झ्युरिच : सलग तीन वर्षे कोणतेही व्यवहार न होता निष्क्रिय’ राहिलेल्या ३,५०० खात्यांचा तपशील स्विस बँकांनी याही वर्षी जाहीर केला असून त्यात भारताशी संबंधित सहा खाती असून त्यातील ३०० कोटी रुपये रकमेवर दावा सांगायला कोणीही पुढे आलेले नाही. स्विस नॅशनल बँकेने यंदा जाहीर केलेल्या यादीत भारताशी संबंधित अशा या प्रत्येक ‘निष्क्रिय’ खात्यात किती पैसे आहेत याचा तपशील नाही. मात्र त्या सर्व खात्यांमध्ये मिळून ४४ दशलक्ष स्विस फ्रँक्स (सुमारे ३०० कोटी रु.) असावेत, असा अंदाज आहे. या सहा खातेदारांपैकी तिघांचे वास्तव्य भारतातील, एकाचे पॅरिस (फ्रान्स) व एकाचे लंडन असे देण्यात आले आहे. सहावा खातेदार नेमका कुठला आहे याची उल्लेख नाही.
सन २०१५ पासून स्वित्झर्लंडच्या बँकिंग लोकपालांनी अशा खात्यांची यादी जाहीर करणे सुरु केले. वरील सहा खाती तेव्हापासून या यादीत आहेत. कोणी दावेदार पुढे येऊन त्याने समाधानकारक पुरावे दिले तर ते खाते वगळले जाते. सन २०१५ च्या यादीतील ४० खाती व दोन सेफ डिपॉझिट लॉकरधारकांची नावे अशा प्रकारे गेल्या वर्षी वगळण्यात आली होती.
ज्यामध्ये किमान ५०० स्विस फ्रँक्स एवढी रक्कम आहे व गेल्या ६० वर्षांमध्ये ज्यांच्यासाठी कोणीही दावेदार पुढे आलेला नाही अशाच खात्यांमधून ही यादी प्रसिद्ध केली जाते. या यादीत बहुसंख्य खातेदार स्वित्झर्लंडमधीलच आहेत. त्याखेरीज जर्मनी, ब्रिटन, अमेरिका, तुर्कस्तान, आॅस्ट्रिया, पाकिस्तानसह इतरही देशातील खातेदार यात आहेत.
यादीत नाव प्रसिद्ध झाल्यापासून वर्षभरात कोणी दावेदार पुढे न आल्यास त्या खात्यातील रक्कम संबंधित खात्यातील रक्कम स्विस सरकारकडे सुपूर्द करू शकते. संबंधित खाते किमान १९५४ पासून ‘निष्क्रिय’ राहिलेले असेल तरदावा करण्यासाठीची मुदत पाच वर्षांची आहे. (वृत्तसंस्था)
>जाहीर झालेल्या माहितीनुसार हे सहा खातेदार असे: पिअरे वाचेक व बर्नेट रोझमेरी (मुंबई), बहादूर चंद्र सिंग (डेहराडून), डॉ. मोहन लाल (पॅरिस), योगेश प्रभूदास सूचक (लंडन) व किशोर लाल (वास्तव्याचे ठिकाण अज्ञात). यापैकी एकाची-वाचेक यांची जन्मतारीख १ जानेवारी १९०८ अशी दिलेली आहे. ती खरी असेल, तर ही व्यक्ती आज ११० वर्षांची आहे.