बसला आग लागून ३१ लहान मुले ठार
By admin | Published: May 20, 2014 12:20 AM2014-05-20T00:20:15+5:302014-05-20T00:20:15+5:30
चर्चमधील कार्यक्रम आटोपून परत येणार्या बसला आग लागून ३१ मुले व एक प्रौढ व्यक्ती ठार झाल्याची घटना कोलंबियात घडली
बोगोटा : चर्चमधील कार्यक्रम आटोपून परत येणार्या बसला आग लागून ३१ मुले व एक प्रौढ व्यक्ती ठार झाल्याची घटना कोलंबियात घडली. या गाडीतील इंधनाच्या साठ्याचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे आपत्कालीन समन्वयकाने सांगितले. मृत मुलांचे मृतदेह पूर्णपणे जळालेले असून, दातांच्या नोंदीवरून त्यांची ओळख पटविली जात आहे. ही सर्व मुले १ ते ८ च्यादरम्यान होती. फुंडाकेशन गावाजवळ हा अपघात झाला असून, बारांक्वीला या जवळच्या शहरात ओळख पटविली जात आहे, असे माग्दालेना प्रांताचे समन्वयक मेजर एडवर्ड व्हेलेझ यांनी सांगितले. या दुर्घटनेत १८ मुलांसह २५ जण जखमी असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सांता मार्टा येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत. बसमध्ये पेट्रोल भरलेला कॅन ठेवण्यात आला होता. त्याचा स्फोट झाला व आग झपाट्याने पसरली, असे व्हेलेझ यांनी सांगितले. (वृत्तसंस्था) बसच्या चालकाने इंजिनात इंधन ओतून चुकीच्या पद्धतीने ही मोडकी बस चालवली. चालकाच्या केबिनमध्येही तो खालून चढला . बसचालक सुखरूप सुटला असून, त्याची चौकशी केली जात आहे. ही बस एका खाजगी कंपनीची होती व गेल्या आठवड्यापासून शाळकरी मुलांना घरी आणण्यासाठी ती वापरली जात होती. अध्यक्ष ज्युआन मॅन्युअल सांतोस घटनास्थळी जात आहेत.