दोन जहाजांच्या धडकेत ३२ कर्मचारी बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:09 AM2018-01-08T01:09:57+5:302018-01-08T13:21:15+5:30
इराणहून दक्षिण कोरियाकडे तेल घेऊन निघालेल्या जहाजाची (आॅईल टँकर) मालवाहू जहाजाशी धडक होऊन लागलेल्या आगीत टँकरवरील ३२ कर्मचारी बेपत्ता आहेत. कर्मचा-यांत बहुतेक जण इराणी आहेत. पूर्व चीनच्या किना-यापासून दूर अंतरावर हा अपघात घडला.
बीजिंग : इराणहून दक्षिण कोरियाकडे तेल घेऊन निघालेल्या जहाजाची (आॅईल टँकर) मालवाहू जहाजाशी धडक होऊन लागलेल्या आगीत टँकरवरील ३२ कर्मचारी बेपत्ता आहेत. कर्मचा-यांत बहुतेक जण इराणी आहेत. पूर्व चीनच्या किना-यापासून दूर अंतरावर हा अपघात घडला.
पनामामध्ये नोंदणी असलेल्या या आॅईल टँकरमध्ये १३६००० टन तेल होते. त्याची हाँगकाँगमध्ये नोंदणी असलेल्या जहाजाशी शनिवारी रात्री आठ वाजता धडक होऊन तेलाने पेट घेतला. त्यानंतर ३० इराणी व दोन बांगलादेशी कर्मचारी बेपत्ता झाले, असे चीनच्या वाहतूक मंत्रालयाने निवेदनात सांगितले. अपघात शांघायच्या पूर्वेला सुमारे १६० सागरी मैलांवर घडला. जहाजावरील सर्व २१ चिनी कर्मचाºयांना वाचवण्यात आले आहे. सांची नावाचे हे २७४ मीटर लांब आॅईल टँकर इराणी जहाज कंपनीच्या मालकीचे आहे. दोन जहाजांची धडक झाल्यावर तेलाचे जहाज पेटले ती आग अजून सुरूच आहे, असे वृत्त मंत्रालयाच्या हवाल्याने शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने दिले. अपघातामुळे समुद्रात तेल
पसरले परंतु त्यामुळे किती भाग दूषित झाला हे त्यात नमूद नाही. सांची अजूनही पाण्यावर तरंगत असून जळतच आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर अजून तेल असून शोध आणि बचाव काम सुरू आहे.
(फोटो सौजन्य : reuters.com)