सौदीत ३२ महिला चालवतील बुलेट ट्रेन! भविष्याच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 06:20 AM2023-01-17T06:20:51+5:302023-01-17T06:21:02+5:30
आत्ता आत्तापर्यंत या देशातील महिला अनेक मूलभूत हक्कांपासूनही वंचित होत्या. अगदी चार वर्षांपूर्वीपर्यंत या देशातील महिलांना कार चालवायचाही अधिकार नव्हता.
सौदी अरब हा देश गेल्या काही वर्षांत अनेक कारणांनी चर्चेत आहे. मध्यपूर्वेतील हा एक मुस्लीम देश. ज्या देशांमध्ये कायदे अतिशय कडक आहेत, त्यात सौदी अरेबियाचाही समावेश होतो. या देशाची अर्थव्यवस्था अर्थातच मुख्यत्वे तेलावर चालते. खनिज तेलाची अवाढव्य उपलब्धता या देशात आहे. त्याचाच उपयोग करून या देशानं आपली प्रगती करून घेतली आहे. त्यामुळे या देशाचं नावही झपाट्यानं जगाच्या नकाशावर झळकू लागलं. पण त्याचबरोबर सरंजामी कायद्यांमुळेही या देशाची जगात ओळख आहे. प्रतिगामी कायद्यांची सगळ्यात मोठी झळ अर्थातच सर्वात आधी त्या-त्या देशांतील महिलांना बसते. सौदी अरेबियाही त्याला अपवाद नाही.
आत्ता आत्तापर्यंत या देशातील महिला अनेक मूलभूत हक्कांपासूनही वंचित होत्या. अगदी चार वर्षांपूर्वीपर्यंत या देशातील महिलांना कार चालवायचाही अधिकार नव्हता. त्यासाठी येथील महिलांनी मोठं आंदोलन केलं, प्रसंगी कायदा मोडला, तुरुंगात गेल्या आणि त्यांनी ड्रायव्हिंगचा आपला हक्क मिळवलाच. महिलांची हिंमत त्यामुळे खूपच वाढली. म्हटलं तर हा अगदी छोटासा विजय, पण स्वातंत्र्याचं स्फुलिंग त्यामुळे महिलांमध्ये चेतवलं गेलं. ज्या-ज्या गोष्टी आजवर त्यांना करता येत नव्हत्या, त्यासाठी कायद्यानंच मज्जाव होता, त्या-त्या प्रत्येक गोष्टीविरुद्ध त्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली. अर्थातच सौदी अरेबियाच्या सरकारलाही महिलांच्या या प्रश्नांची, त्यांच्या आंदोलनांची दखल घ्यावी लागली आणि काही हक्क त्यांना मिळाले. पुरुष-स्त्री असमानता काही प्रमाणात दूर झाली.
सौदी अरेबियात सध्या प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे पंतप्रधान आहेत. त्यांनी स्वत:ही सौदी अरेबियाचा कायापालट करण्याची मनीषा बाळगली आहे. येत्या काही वर्षांत सौदी अरेबियातलं तेल संपेल आणि आपल्याला कोणीही वाली राहणार नाही, त्यासाठी आत्ताच काही पर्यायी व्यवस्था करून ठेवावी लागेल, हे त्यांनाही माहीत आहे. त्यामुळे ‘द लाइन’ नावाचं ‘भविष्यातलं शहर’ उभारायला त्यांनी सुरुवात केली आहे. त्यासाठी जगभरातून पैसा गोळा करताना, याच माध्यमातून सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था भविष्यकाळात आणखी झेप घेईल, यासाठीची आखणी त्यांनी सुरू केली आहे. जगाचा पैसा आपल्या देशाकडे ओढताना, ‘पुरोगामी’ देश म्हणून आपल्या देशाची प्रतिमा निर्माण करायचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनीही आपल्या देशातील महिलांना अनेक सुविधा द्यायला सुरुवात केली आहे.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता सौदी अरेबियातील महिलांना बुलेट ट्रेन चालवायचीही परवानगी मिळाली आहे. अर्थातच यात या देशातील महिलांची जिद्द, मेहनत आणि त्यांच्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षेचा वाटाही खूपच मोठा आहे. ‘व्हिजन २०-३०’ या योजनेद्वारे महिलांचं हे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारणार आहे. बुलेट ट्रेनद्वारे आपल्या देशातील लोकांना धार्मिक स्थळांची यात्रा घडविण्यात या महिलांचा हातभार असणार आहे. त्यासाठी तब्बल ३२ महिला ड्रायव्हर्सचं पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. त्यांची पहिली नियुक्ती मक्का आणि मदिना दरम्यान चालणाऱ्या बुलेट ट्रेनच्या ड्रायव्हर म्हणून करण्यात आली आहे. देशातील जे अनुभवी ड्रायव्हर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता त्या बुलेट ट्रेनवर स्वार होतील.
या घटनेमुळे या महिला तर अत्यंत खुश आहेतच, पण देशातल्या सर्वसामान्य लोकांनीही या घटनेचं स्वागत केलं आहे. केवळ सौदी अरेबियाच नव्हे, संपूर्ण मध्यपूर्वेसाठीच ही अतिशय मोठी घटना आहे. कारण बुलेट ट्रेन चालविणाऱ्या मध्य पूर्वेतील या पहिल्याच महिला आहेत. सौदी अरेबियाच्या रेल्वेनंही या ३२ महिला लवकरच स्वतंत्रपणे बुलेट ट्रेन चालवतील, असं जाहीर केलं आहे. या महिला ड्रायव्हर्सचा एक व्हिडीओही त्यांनी यासोबत शेअर केला आहे. आपल्या पुरुष सहयोगी ड्रायव्हर्ससोबत या महिला दिसताहेत. याचंही जनतेनं स्वागत केलं आहे.
‘पहिली महिला’ म्हणून अनेक बहुमान!
देशात पहिल्यांदाच बुलेट ट्रेन चालविण्याचा अधिकार महिलांना मिळाला आणि त्यात आमचा समावेश आहे, ही आमच्यासाठी आणि देशासाठी खरंच प्रतिष्ठेची बाब आहे, असं या पायलट महिलांना वाटतं. ४५३ किलोमीटर लांबीच्या हर्मन हायस्पीड रेल्वे लाइनवर बुलेट ट्रेन चालविण्याचा दिवस आता फार लांब नाही. हाच रेल्वे मार्ग मक्का आणि मदिनेला जोडतो. महिलांच्या याच जिद्दीमुळे सौदी एअरलाइनमधील सर्व महिलांचा पहिला क्रू, महिला सैनिक, सौदीची पहिली महिला क्रेन ड्रायव्हर, पहिली अंतराळवीर... असे अनेक बहुमानही अलीकडच्या काळात त्यांनी मिळवले आहेत.