टॅल्कम पावडरमुळे कर्करोग महिलेला ३२५ कोटी भरपाई
By admin | Published: May 5, 2016 02:46 AM2016-05-05T02:46:58+5:302016-05-05T02:46:58+5:30
सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या टॅल्कम पावडरमुळे कर्करोग झाल्याचा दावा मान्य करून येथील न्यायालयाने बाधित महिलेला ५५ दशलक्ष
सेंट लुईस (अमेरिका): सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या टॅल्कम पावडरमुळे कर्करोग
झाल्याचा दावा मान्य करून येथील न्यायालयाने बाधित महिलेला ५५ दशलक्ष डॉलरची (सुमारे ३२५ कोटी रु.) भरपाई देण्याचा आदेश
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या
बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीला दिला आहे.
कंपनीची टॅल्कम पावडर कित्येक वर्षे वापरल्याने आपल्याला बिजांडकोशाचा (ओव्हरिज) कर्करोग झाला, असा आरोप करून दक्षिण डाकोटा राज्यातील ग्लोरिया रिस्तेसूंद या महिलेने जॉन्सन अॅण्ड जॉन्सनविरुद्ध दावा दाखल केला होता. त्यात झालेल्या साक्षीपुराव्यांवर ज्युरींनी आठ तास विचार केला आणि फिर्यादी महिलेचा दावा मान्य करून तिला वरीलप्रमाणे भरपाई देण्याचा आदेश दिला.
सेंट लुईस येथील न्यायालयाने गेल्या तीन महिन्यांत या कंपनीविरुद्ध अशी मोठी भरपाई देण्याचा दिलेला हा दुसरा आदेश आहे.याआधी फेब्रुवारीत ७२ दशलक्ष डॉलर भरपाई देण्याचा निकाल झाला होता. बिजांडकोशाच्या कर्करोगाने मृत्यू झालेल्या अलाबामा राज्यातील एका महिलेच्या कुटुंबियांनी तो दावा दाखल केला होता. ती महिला कित्येक वर्षे या कंपनीची जॉन्सन्स बेबी पावडर व अन्य सौंदर्य परसाधने वापरायची. या उत्पादनांच्या सततच्या वापराने
तिला कर्करोग झाल्याची ती फिर्याद होती.
टॅक्लम पावडरच्या वापराने घातक दुष्परिणाम झाल्यासंबंधीचे आणखी १२०० हून अधिक दावे जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीविरुद्ध प्रलंबित आहेत. त्यातील सुमारे एक हजार सेंट लुईसमध्ये तर २०० न्यू जर्सीत आहेत.
याआधी आरोग्य आणि ग्राहक हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीने त्यांच्या अत्यंत लोकप्रिय ‘नोमोअर टियर्स’ या लहान मुलांच्या शॅम्पूसह इतरही अनेक उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या संभाव्य हानीकारक घटकांविरुद्ध मोहिमा चालविल्या होत्या. ‘कॅम्पेन फॉर सेफ कॉस्मेटिक्स’ या अशा स्वयंसेवी संघटनांच्या महासंघाने कंपनीने त्यांच्या लहान मुलांच्या व प्रौढांच्या उत्पादनांमध्ये हानीकारक घटक वापरू नयेत यासाठी मोहीम चालविली होती.
तीन वर्षांच्या अशा मोहिमा, प्रतिकूल प्रसिद्धी व बहिष्काराच्या धमकीनंतर कंपनीने त्यांच्या सर्व उत्पादनांमधून ‘१,४-डायोक्झेन’ व ‘फॉर्मलाहाईड’ या दोन घटकांचा वापर वर्र्ष २०१५ पर्यंत पूर्णपणे बंद करण्याचे सन २०१२ मध्ये मान्य केले होते. (वृत्तसंस्था)
टॅल्क म्हणजे काय ?
टॅल्कम पावडरमध्ये ‘टॅल्क’ हा मुख्य घटक असतो. ‘टॅल्क’ हे मातीमधून मिळणारे एक नैसर्गिक द्रव्य आहे. त्यात मॅग्नेशियम, सिलिकॉन, आॅक्सिजन व हायड्रोजनचा समावेश असतो. सौंदर्यप्रसाधने व स्वच्छता उत्पादनांमध्ये त्याचा सर्रास वापर केला जातो.
जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी सतत ३० वर्षे संशोधन करून सौंदर्य प्रसाधनांमध्ये टॅल्कचा वार पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली आहे. दुर्दैवाने ज्युरींनी याच्या विरुद्ध निकाल दिला आहे. याविरुद्ध आम्ही वरच्या न्यायालयातअपील करू. गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ कंपनी ग्राहकांना सुरक्षित उत्पादने पुरवीत आली आहे व यापुढेही आम्ही ग्राहकांच्या अपेक्षेहून
चांगली उत्पादने देत राहू.
-कॅरॉल गूडरिच, प्रवक्ती, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन
टॅल्कम पावडर आणि बिजांडकोशाचा कर्करोग यांच्यातील अन्यान्य संबंध संशोधकांना १९७० च्या दशकापासूनच दिसून आले होते. जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीलाही याची माहिती होती हे त्यांच्याच अंतर्गत कागदपत्रांवरून दिसते. परंतु तरीही ग्राहकांना सावध न करता उलट कंपनीने ज्या स्थूल महिलांना टॅल्कच्या वापराने बिजांडकोशोचा कर्करोग होण्याची सर्वाधिक शक्यता असते त्यांनाच खास करून डोळ््यापुढे ठेवून टॅल्कम पावडर विकण्यासाठी आक्रमक माहिम राबविली.
-जिम आॅण्डर, फिर्यादी कॅरॉलचे वकील