टोरोंटो साहित्य संमेलनाचा डिजिटल मांडव सजला!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 07:13 PM2020-05-09T19:13:55+5:302020-05-09T19:16:17+5:30
गेल्या बत्तीस वर्षांची उन्हाळी आयोजनाची परंपरा जपणारा हा कॅनडातला मराठी कार्यक्रम कात टाकून ‘न्यू नॉर्मल’चे स्वागत करण्यास तयार झाला आहे.
कोरोनाच्या जागतिक उत्पाताने जगभरातील लोकांना ‘शारीरिक दुरावा’ सक्तीचा केल्याने आता येत्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काय, असा प्रश्न हळूहळू मराठी साहित्य क्षेत्रात मान वर काढत असताना तिकडे पंधरा हजार मैलावरच्या कॅनडातल्या टोरोंटोमध्ये मात्र ‘३२ व्या टोरोंटो साहित्य संमेलना’चा डिजिटल मांडव सजला आहे.
टोरोंटोच्या स्थानिक वेळेनुसार शनिवारी (9मे) संध्याकाळी हे उत्तर-अमेरिका मराठी साहित्य संमेलन वेगवेगळ्या डिजिटल कट्ट़्यांवर लाईव्ह रंगणार असून भारतात रविवारच्या पहाटे दीड वाजल्यापासून ते ‘लाईव्ह’ दिसेल.
खरे तर कोविडने सगळ्यांनाच आता चार भिंतीत कोंडून घातल्याने ‘ऑनलाईन’ मिटिंगांपासून गाणी-नृत्यं आणि अगदी वाढदिवसांच्या कैण्डल लाईट डिनर्सपर्यंत सगळेच ‘व्हर्चुअल’ होते आहे. त्यामुळे साहित्य संमेलन ‘डिजिटल’ होण्यात नवीन ते काय?
- टोरोंटो साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य असे, की गेल्या बत्तीस वर्षांची उन्हाळी आयोजनाची परंपरा जपणारा हा कॅनडातला मराठी कार्यक्रम कात टाकून ‘न्यू नॉर्मल’चे स्वागत करण्यास तयार झाला आहे.
उत्तर अमेरिकेतील हे पहिले मराठी साहित्य संमेलन, मधुसूदन भिडे यांनी ३२ वर्षांपूर्वी, टोरोंटो मध्ये सुरु केले. गेली ३१ वर्ष सातत्याने दर वर्षी मार्च/एप्रिल महिन्यांत या संमेलनाचे आयोजन केले जाते. टोरोंटो मधील मराठी लेखकांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे आणि साहित्य प्रेमींना नवीन मराठी साहित्याचा आनंद घेण्याची संधी देणे, हे या संमेलनाचे प्रमुख उद्देश!
या वर्षीचे संमेलन ४ एप्रिलला ठरले होते, पण कोरोनाच्या प्रकोपामुळे ते अर्थातच रद्द करावे लागले.
परदेशात राहतांना आधीच एकलकोंडे आयुष्य असते. त्यात आता कोरोनाने लादलेला सक्तीचा एकांतवास. मराठी मंडळात होणाऱ्या कार्यक्रमांमुळे लोकांना भेटण्याची आणि परस्परांशी मराठीत बोलता येण्याची संधी मिळत असते पण या वर्षी ते शक्य होणार नाही अशी चिन्हें होती. अशा वेळेस लोकांना टोरोंटोच्या मराठी भाषिक मंडळाकडून अपेक्षा होत्या.
गेल्या ३-४ वर्षात टोरोंटो मध्ये येणाºया मराठी लोकांची संख्या खूप वाढली आहे. विशेषत: मागच्या ४-६ महिन्यात कॅनडामध्ये नवीन आलेल्या लोकांसाठी हे वातावरण अधिकच आव्हानात्मक आहे. कुटुंबातील आणि मित्र मंडळींपैकी जवळचे कोणी नाही, विशेष ओळखी नाहीत, सध्या नोकरी मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अशा वेळेस मानसिक आधार खूप महत्वाचा असतो. तो या डिजिटल संमेलनामार्फत देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, असे मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ सरनोबत सांगतात.
हे उत्तर अमेरिकेतील पहिले ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन असणार आहे. नव्या पिढीसाठी वेगवेगळी ऑनलाईन साधने, मार्ग वापरणे हे आता सरावाचे आहे, पण गेली तीन दशके संमेलन सुरु असल्याने, बरेच ज्येष्ठ नागरिक त्याला उपस्थित असतात. त्यांना या वषीर्ही त्यात भाग घेता यावा म्हणून काही टेक सॅव्ही ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:हून बाकीच्यांना डिजिटल कट्टे लाईव्ह कसे वापरावेत, हे शिकवण्याची जबाबदारी घेतली.
दरवर्षी संमेलन बघण्यासाठी तिकीट विकत घ्यायचे असते पण या वर्षी लोकांना आर्थिक अडचणी असू शकतात म्हणून प्रेक्षकांसाठी विनामूल्य करण्याचे ठरले आणि जास्तीत जास्त लोकांना बघता यावे म्हणून फेसबुकवरही लाइव्ह ब्रॉडकास्ट केले जाणार आहे.
- फेसबुक लाईव्ह मुळे जगभरात कुठेही मराठी रसिक हे संमेलन बघू शकतील. लाईव्ह बघता नाही आले तरी कार्यक्रम झाल्यावर त्याचे रेकॉर्डिंग https://www.facebook.com/mbmtoronto/ या लिंक वर उपलब्ध राहील.
संमेलनात आपले लेख, कविता वाचून दाखवणाऱ्या लेखकांकडून दर वर्षीप्रमाणे प्रवेश शुल्क घेतले जाणार असून यातून जमा होणारा निधी कोरोनाग्रस्तांसाठी काम करणाऱ्या ओन्टारियो मधील फूड बँक्स आणि हॉस्पिटल्सना देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या तयारीसाठी अध्यक्ष श्रीनाथ सरनोबत, सेक्रेटरी वृणाल देवळे, खजिनदार राज गावडे, संमेलनाची आयोजक टीम गायत्री गद्रे, निषाद सोमण, अनिल विंगळे, संगणक तज्ञ रोहन भाजेकर, सोशल मीडिया टीम हिरणमय कोपरकर, दुर्गेश खटावकर आणि अमेय गोखले यांचे मुख्य योगदान आहे.
- संमेलन ऑनलाईन होत असल्याने, दाद द्यायला प्रेक्षक समोर बसलेले नसतील याची जाणीव असून सुद्धा सगळ्या लेखकांच्या उत्साहात जराही कमतरता नाही, त्या उलट एका अभिनव प्रयोगात भाग घेता येतोय याचा त्यांना आनंदच वाटतो आहे.