अमेरिकेत लोक ३३ कोटी, शस्त्रं?- ३९ कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 05:29 AM2021-06-03T05:29:13+5:302021-06-03T05:32:59+5:30
अमेरिकेत लोक कोणत्याही प्रकारची घातक शस्त्रं खरेदी करू शकतात, त्यामुळे हिंसाचार वाढतो आहे, पण इतर देशांची चिंताही त्यामुळे वाढली आहे. ब्रिटननं तर यासंदर्भात स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.
जग जसजसं ‘प्रगत’, आधुनिक होत आहे, तसतसा जगातला हिंसाचार वाढतो आहे. शस्त्राच्या धाकावर एकमेकांचा बळी घेतला जात आहे. यात एकाच वेळी लक्षावधी लोकांना ठार करू शकणाऱ्या अणुबॉम्बचा समावेश तर आहेच; पण लोकांनी स्वत:च्या ‘सुरक्षे’साठी आपल्याकडे बाळगलेल्या हत्यारांमुळे जाणारे बळी अधिक चिंताजनक आहेत. अमेरिकेसारखे प्रगत आणि बलाढ्य राष्ट्रही यात मागे नाही. उलट अमेरिकेतील हिंसाचार इतर कित्येक देशांमधील हिंसाचारापेक्षा कितीतरी अधिक आहे.
अमेरिकेतील हिंसाचाराच्या बातम्या आपल्याला नेहमीच ऐकू येत असतात.. सार्वजनिक सभागृहं, चर्चेस, नाइटक्लब, म्युझिक फेस्टिवल, इतकंच काय प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्येही मुलांनी सामूहिक हिंसाचार केल्याच्या घटना सतत घडत असतात. त्यात अजूनही घट झालेली नाही. अमेरिका हा असा एकमेव ‘प्रगत’ देश आहे, जिथे हिंसाचाराच्या या घटना वाढतच आहेत आणि त्या रोखण्याचा कोणताही उपाय अजून अमेरिकेला तरी सापडलेला नाही.
लोकांच्या मनात असलेली असुरक्षितता, अस्वस्थता, केव्हाही, कोणाच्याही शस्त्रानं आपला नाहक बळी जाऊ शकतो, या भीतीनं अमेरिकन नागरिकांमध्ये शस्त्रास्त्रं खरेदीची जणू अहमहमिका लागलेली असते. हे अमेरिकन गन कल्चर आता इतकं वाढलं आहे, की लोक त्याचं खुलेआम प्रदर्शनही करू लागले आहेत; पण त्यापेक्षाही चिंताजनक बाब म्हणजे अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षाही लोकांकडे असलेल्या वैयक्तिक शस्त्रास्त्रांची संख्या अधिक आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, अमेरिकेची लोकसंख्या साधारणपणे ३३ कोटी आहे; पण त्यांच्या नागरिकांकडे असलेल्या वैयक्तिक, घातक शस्त्रांची संख्या तब्बल ३९ कोटींपेक्षाही अधिक आहे. त्यात पिस्तूल, बंदुकीपासून ते ॲटोमॅटिक मशीनगन्सपर्यंतचा समावेश आहे. म्हणजे लहान मुलं, महिलांसहित एकूण नागरिकांची संख्या लक्षात घेतली, प्रत्येकाकडे घातक शस्त्र आहे, असं मानलं तरी आणखी तब्बल सहा कोटी हत्यारं उरतातच. अर्थातच अनेक अमेरिकी नागरिकांकडे एकापेक्षा जास्त हत्यारं आहेत.
गेल्या काही वर्षांत अमेरिकन नागरिकांमध्ये हत्यारं खरेदीची जणू चुरस लागली आहे. गेल्या वर्षी कॅपिटल हिल्सवर झालेल्या हिंसाचारानंतर यात अधिकच वाढ झाली असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षीच्या ‘कॅपिटल हिल्स’च्या हिंसाचारानंतर अमेरिकेत हत्यारं खरेदी करणाऱ्यांची संख्या तब्बल ९० टक्क्यांनी वाढली आहे. टेक्सासमधल्या एका परिवाराकडे तर तब्बल १७० हत्यारं आहेत. त्यात मशीनगन्सचाही समावेश आहे. या शस्त्रांचं त्यांनी आपल्या घरासमोरच प्रदर्शनही मांडलं होतं आणि अनेक नागरिकांनी त्यांचं हे ‘कलेक्शन’ पाहून त्यांचं ‘कौतुक’ही केलं होतं. अमेरिकेत अशी अनेक कुटुंबं आहेत, जी आपल्या शस्त्रांचं प्रदर्शन आपले नातेवाईक आणि आपल्या मित्रमंडळींकडे सातत्यानं करीत असतात.
जगातील गरीब आणि विकसनशील देशांमध्ये हिंसाचाराचं प्रमाण जास्त असतं असं मानलं जातं. एल साल्वाडोर या देशात ‘गन कल्चर’मुळे बळी पडणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचं प्रमाण जगात सर्वाधिक आहे.
अमेरिकेतल्या हिंसाचाराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे लोकांकडे इतकी शस्त्रं आहेत, पण त्यांचा उपयोग इतरांना मारण्यापेक्षाही स्वत:लाच मारण्यासाठी अधिक प्रमाणावर केला जातो. म्हणजे या हत्यारांनी लोक स्वत:चाच बळी घेऊन आत्महत्या करीत आहेत. हत्यारांनी आत्महत्या करण्याचं प्रमाण जगात ग्रीनलँडमध्ये सर्वाधिक आहे, पण त्यानंतर याबाबतीत अमेरिकेचा जगात दुसरा क्रमांक लागतो. स्वत:च्याच हत्यारांनी आत्महत्या करणाऱ्यांची संख्या यातून वगळली तरीही हत्यारांमुळे नागरिकांच्या होणाऱ्या हत्येत अमेरिकेचा जगात २८वा क्रमांक लागतो. हत्यारांमुळे हिंसाचाराबरोबरच अपघाताने बळी जाणाऱ्यांची संख्याही अमेरिकेत बरीच मोठी आहे.
अमेरिकेत शस्त्रास्त्रनिर्मितीचा उद्योग प्रचंड प्रमाणात आहे आणि अमेरिकेतून जगाला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं पुरवली जात असली तरी शस्त्रास्त्रांच्या आयातीचं प्रमाणही अमेरिकेत प्रचंड मोठं आहे. जागतिक बँक, ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स’ आणि इतरही काही संस्थांनी केलेल्या अभ्यासात जपान, युनायटेड किंगडम्, सिंगापूर, साऊथ कोरिया इत्यादी श्रीमंत राष्ट्रांत मात्र अमेरिकेसारखं गन कल्चर वाढीस लागलेलं नसल्याचं आढळून आलं आहे.
अमेरिकेतील शस्त्रांमुळे जगाला चिंता
अमेरिकेत लोक कोणत्याही प्रकारची घातक शस्त्रं खरेदी करू शकतात, त्यामुळे हिंसाचार वाढतो आहे, पण इतर देशांची चिंताही त्यामुळे वाढली आहे. ब्रिटननं तर यासंदर्भात स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटनमध्ये गेल्या दोन वर्षांत तेथील नागिरकांकडून एक हजारापेक्षाही जास्त खतरनाक हत्यारं जप्त करण्यात आली आहेत, जी अमेरिकेत ‘लायसेन्स’वर खरेदी करण्यात आली होती आणि नंतर ब्रिटनमध्ये अवैध मार्गाने पोहोचवली गेली होती. ब्रिटनमध्ये सध्या ज्या काही हिंसाचाराच्या घटना घडताहेत, त्यात अमेरिकन हत्यारांचा मोठा वाटा असल्याचं दिसून आलं आहे.