३३ राखीव जागाही इम्रान खानकडे, बहुमताचा मार्ग सुकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 05:35 AM2018-08-13T05:35:54+5:302018-08-13T05:36:16+5:30
पाकिस्तान निवडणूक आयोगाने ‘नॅशनल अॅसेंब्ली’ या संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील महिला आणि मुस्लिमेतर अल्पसंख्य समाज यांच्यासाठी राखीव असलेल्या अनुक्रमे २८ व पाच जागा इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाच्या झोळीत टाकल्या
इस्लामाबाद: पाकिस्तान निवडणूक आयोगाने ‘नॅशनल अॅसेंब्ली’ या संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील महिला आणि मुस्लिमेतर अल्पसंख्य समाज यांच्यासाठी राखीव असलेल्या अनुक्रमे २८ व पाच जागा इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाच्या झोळीत टाकल्याने पंतप्रधान होणारा हा माजी क्रिकेटपटू स्पष्ट बहुमताच्या आणखी जवळ पोहोचला.
एकूण ३४२ जागांपैकी ६० जागा महिलांसाठी व १० अल्पसंख्य समाजांसाठी राखीव असतात. यासाठी निवडणूक होत नाही. राहिलेल्या जागांसाठी थेट मतदानाने निवडणूक घेतली जाते व त्यात ठरणाऱ्या पक्षीय बलाबलाच्या प्रमाणात राखीव जागांचे वाटप केले जाते. वाट्याला आलेल्या राखीव जागांवर त्या त्या पक्षाने आपले उमेदवार नेमायचे असतात.
इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ पक्षाला १२३ जागा मिळाल्या होत्या. त्या प्रमाणात त्यांना आता आणखी ३३ राखीव जागा मिळाल्याने पक्षाची सदस्यसंख्या १५८ वर पोहोचली. स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला किमान १७२ चा आकडा गाठण्यासाठी इम्रान खान यांना आता फक्त १४ बाहेरच्या सदस्यांचा पाठिंबा मिळवावा लागेल. लहान आणि प्रादेशिक पक्षांकडून एवढे जास्तीचे सदस्य सहज मिळतील, असा विश्वास ‘पीटीआय’ पक्षाच्या प्रवक्त्याने व्यक्त केला आहे.
शपथविधीचा मुहूर्त ठरेना
इम्रान खान यांचा येत्या १८ आॅगस्ट रोजी पंतप्रधानपदी शपथविधी होईल, असे त्यांच्या पक्षाने जाहीर केले असून, तशी निमंत्रणेही मित्र व चाहत्यांना दिली गेली आहेत. राष्ट्राध्यक्षांकडून मात्र अद्याप शपथविधीची तारीख ठरलेली नाही.