अमेरिकेत अवैधपणे घुसखोरीच्या नादात ३३ वर्षीय गर्भवती महिलेचा नदीत बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:21 IST2025-02-07T13:20:39+5:302025-02-07T13:21:17+5:30
पतीच्या तक्रारीनंतर २ दिवसांनी एनाचा मृतदेह सापडला होता. नदीत बुडून तिचा मृत्यू झाल्याचं बोलले गेले

अमेरिकेत अवैधपणे घुसखोरीच्या नादात ३३ वर्षीय गर्भवती महिलेचा नदीत बुडून मृत्यू
अमेरिकेने अलीकडेच १०४ बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात परत पाठवले आहे. त्यानंतर डंकी रूट आणि या मार्गाने जाणाऱ्या भारतीयांची वेदनादायी कहाणी समोर आली आहे. हे लोक कशारितीने अमेरिकेत लपूनछपून जातात, तिथे कसं आयुष्य जगतात, त्याहून अधिक त्यांनी या मार्गाने का जायचं ठरवलं, जिथून मृत्यूचाही धोका सर्वाधिक आहे हेदेखील उघड झाले. अमेरिकेत स्थलांतरितांना त्यांच्या देशातून बाहेर काढणाऱ्या घटना समोर असतात त्यात आणखी एका महिलेची कहाणी पुढे आली आहे.
मॅक्सिकोच्या एका महिलेला तस्करी करून अमेरिकेत नेले जात होते. या महिलेचे वय ३३ होते आणि ती गर्भवती होती. या महिलेच्या प्रकरणात आरोपी झादेर ऑगस्टो उरीबे टोबार याने रात्रीच्या अंधारात नदी पार करत महिलेला घेऊन जात होता. त्यावेळी या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या या महिलेचं नाव एना वास्केज फ्लोरेस असं होते, ती मॅक्सिकोमधील राहणारी होती. १४ डिसेंबर २०२३ रोजी कॅनडाच्या सीमेवर ग्रेट चाजी नदीत तिचा मृतदेह सापडला. बेकायदेशीरपणे सीमा पार करण्याच्या प्रयत्नात रस्त्यात ती हरवली असं एनाच्या पतीने अमेरिकन अधिकाऱ्यांना सांगितले होते.
पतीच्या तक्रारीनंतर २ दिवसांनी एनाचा मृतदेह सापडला होता. नदीत बुडून तिचा मृत्यू झाल्याचं बोलले गेले. महिलेचा शोध घेणाऱ्या अधिकाऱ्यांना तिच्या पायाचे ठसे नदीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यात आढळले होते. अमेरिकेत बेकायदेशीरपणे घुसखोरी करण्याच्या नादात एनाचा मृत्यू झाला होता. ती कॅनडातून न्यूयॉर्क, न्यू इंग्लंडमध्ये घुसण्याच्या प्रयत्नात होती. मोठ्या संख्यने लोक या मार्गाचा वापर करतात.
दरम्यान, महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात ३६ वर्षीय झादेर ऑगस्टो उरीबे टोबार हा आरोपी महिलेची तस्करी करत होता हे समोर आले. टोबारने या महिलेला २५०० अमेरिकन डॉलरला विकलं होते. तो तिला विकण्यासाठी अमेरिकेला घेऊन जात होता. त्यामुळे रात्रीच्या अंधारात त्याने नदी ओलांडण्याचं महिलेला सांगितले. मानवी तस्कराच्या आरोपाखाली उरीबे टोबारवर गुन्हा दाखल झाला आहे.