पाकिस्तानकडून 34 भारतीय मच्छीमारांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 10:19 AM2019-05-08T10:19:40+5:302019-05-08T10:21:27+5:30
पाकिस्तानने भारताच्या 34 मच्छीमारांना अटक केल्याची घटना समोर आली आहे. सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत पाकिस्तानने मच्छीमारांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कराची - पाकिस्ताननेभारताच्या 34 मच्छीमारांना अटक केल्याची घटना समोर आली आहे. सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत पाकिस्तानने मच्छीमारांनाअटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी नौदलाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या मॅरीटाइम सिक्यॉरिटी एजेन्सीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छीमारांसह 6 बोटीदेखील जप्त करण्यात आल्या आहेत.
सर्व मच्छीमारांना स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी नौदला अंतर्गत कार्यरत असलेल्या मॅरीटाइम सिक्यॉरिटी एजेन्सीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या मच्छीमारांना न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार असून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या आधी जानेवारी महिन्यात पाकिस्तानी नौदलाने काही भारतीय मच्छीमारांना अटक केली होती.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एप्रिल महिन्यात 4 टप्प्यांमध्ये 360 भारतीय मच्छीमारांना भारताच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानने कराचीतील लांधी आणि मालिर येथील तुरूंगातून 250 भारतीय मच्छीमारांची तीन टप्प्यांमध्ये सुटका केली होती. भारतीय मच्छीमारांना सागरी हद्द ओलांडल्यावरून यापूर्वीही अनेकदा पाकिस्तानी नौदलाने अटक केली आहे.
श्रीलंकन नौदलाकडून 10 भारतीय मच्छीमारांना अटक
सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत श्रीलंकेच्या नौदलाने 10 भारतीय मच्छीमारांना कटचथिऊ येथे काही दिवसांपूर्वी अटक केली होती. रामनाथपुरम येथील लहान बेट असणाऱ्या कटचथिऊजवळील समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने पकडले. त्यांच्याकडील बोट सुद्धा जप्त केली होती. संबंधित मच्छीमार तामिळनाडूमधील थानगचिमदाम येथील रहिवासी आहेत. सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत श्रीलंकेच्या नौदलाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या नौदलाकडून एका भारतीय मच्छीमाराला कथितरित्या ठार करण्यावरून थानगचिमदाम येथे शेकडो मच्छीमारांनी निदर्शने केली होती. या घटनेमुळे तणाव निर्माण झाल्यानंतर भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी एकमेकांच्या तुरुंगातील मच्छीमारांची सुटका करण्याचा सामंजस्य करार केला. त्यानुसार श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या अनेक भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात आली होती.