बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 04:33 AM2024-10-13T04:33:30+5:302024-10-13T04:35:42+5:30
सरकारने हिंदुंसह सर्व धार्मिक स्थळांचे संरक्षण करावे, अशी मागणी भारताने केली आहे.
ढाका : बांगलादेशमध्ये १ ऑक्टोबरपासून दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना घडल्या आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेला सोन्याचा मुकुट चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. बांगलादेशमध्ये मंदिर व देवी-देवतांना अपवित्र करण्याचा कट रचण्यात येत असून अशा घटना घडवून आणल्या जात आहेत. सरकारने हिंदुंसह सर्व धार्मिक स्थळांचे संरक्षण करावे, अशी मागणी भारताने केली आहे.
दुर्गापुजेशी संबंधित घटनांप्रकरणी बांगलादेश पोलिसांनी १७ लोकांना अटक केल्याचे पोलिसांनी शनिवारी दिली. भारताने या घटनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी कारवाई केली. बांगलादेशातील १७ कोटी लोकसंख्येत हिंदूंची संख्या केवळ ८ टक्के आहे. त्यांचे व्यवसाय, मालमत्ता नष्ट करण्याचा प्रयत्न केला
जातो, मंदिरे उद्ध्वस्त करण्यात येतात, असा आरोप आहे. बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख माेहम्मद युनूस यांनी ढाकेश्वरी मंदिर परिसराची पाहणी केली.