पाकिस्तानमध्ये JUI-F च्या बैठकीत बॉम्बस्फोट; ३५ जण ठार, २०० हून अधिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 07:54 PM2023-07-30T19:54:19+5:302023-07-30T19:57:27+5:30

या स्फोटात आतापर्यंत ३५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर २०० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

35 killed, over 200 injured in blast at political party JUI-F's convention in Pakistan's Khyber Pakhtunkhwa | पाकिस्तानमध्ये JUI-F च्या बैठकीत बॉम्बस्फोट; ३५ जण ठार, २०० हून अधिक जखमी

पाकिस्तानमध्ये JUI-F च्या बैठकीत बॉम्बस्फोट; ३५ जण ठार, २०० हून अधिक जखमी

googlenewsNext

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौरमध्ये हा स्फोट झाला. पाकिस्तानी मीडियानुसार,  खैबर पख्तूनख्वामधील बाजौर भागात जमियत-उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) च्या बैठकीत हा बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. तर या स्फोटात आतापर्यंत ३५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर २०० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

जमियत-उलेमा-ए-इस्लाम-फजलच्या बैठकीला लक्ष्य करून हा स्फोट करण्यात आला. दरम्यान, पोलीस आणि बचाव दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्याचबरोबर पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. डीआयजी मलाकंद यांनी म्हणाले, बॉम्बस्फोट कसा झाला याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही. तपास सुरु आहे. अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज दोन किलोमीटरपर्यंत ऐकू आला.

दरम्यान, बाजौरमधील जमियत-उलेमा-ए-इस्लाम-फजलच्या बैठकीत झालेल्या स्फोटाचे वृत्त 'भयानक' होते, असे माजी माहिती मंत्री फवाद चौधरी म्हणाले. त्यांनी लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. तसेच, जमियत-उलेमा-ए-इस्लाम-फजलचे नेते हाफिज हमदुल्ला यांनी सांगितले की, ते देखील आजच्या बैठकीला उपस्थित राहणार होते, परंतु काही वैयक्तिक कारणांमुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

हा जिहाद नसून दहशतवाद आहे - हाफिज हमदुल्ला
मला मिळालेल्या माहितीनुसार, अनेक जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मी या स्फोटाचा तीव्र निषेध करतो आणि यामागील लोकांना संदेश द्यायचा आहे की, हा जिहाद नसून दहशतवाद आहे.आजची घटना म्हणजे मानवतेवर आणि बाजौरवर हल्ला आहे, असे हाफिज हमदुल्ला म्हणाले. तसेच, या स्फोटाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, जमियत-उलेमा-ए-इस्लाम-फजलला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असे घडले आहे. आमच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करण्यात आले आहे. यावर आम्ही संसदेत आवाज उठवला, पण कारवाई झाली नाही, असेही हाफिज हमदुल्ला यांनी सांगितले.

पाकिस्तानमध्ये वाढला दहशतवाद
या वर्षात पाकिस्तानमध्ये अनेक स्फोट झाले असून, त्यापैकी बहुतांश आत्मघाती स्फोट होते. गेल्या काही दिवसांपूर्वी शिया मशिदीला लक्ष्य करून स्फोट केले होते. काबूलमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर टीटीपीसारख्या दहशतवादी संघटना पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोट मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

Web Title: 35 killed, over 200 injured in blast at political party JUI-F's convention in Pakistan's Khyber Pakhtunkhwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.