इराणी कमांडर कासिम सुलेमानींच्या अंत्ययात्रेला लाखोंची गर्दी, चेंगराचेंगरीत 35 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 03:52 PM2020-01-07T15:52:41+5:302020-01-07T15:57:55+5:30
सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला लाखोंच्या संख्येने इराणी नागरिक पोहोचले आहेत.
तेहरान - अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले इराणचे सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला त्यांचे निवासस्थान असलेल्या करमेन शहरात सुरुवात झाली आहे. सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला लाखोंच्या संख्येने इराणी नागरिक पोहोचले असून, गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे सुमारे 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या संदर्भातील वृत्त एपी या वृत्तसंस्थेने इराणी वृत्तवाहिन्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
शुक्रवारी इराकची राजदानी असलेल्या बगदाद येथे अमेरिकेने केलेल्या ड्रोण हल्ल्यात कासिम सुलेमानींचा मृत्यू झाला होता. दरम्यान, सुलेमानी यांना आज सुपूर्द- ए-खाक करण्यात येणार आहे. सुलेमानींचे निवास्थान असलेल्या करमेल येथून त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली आहे. त्यावेळी आपल्या लाडक्या कमांडरला निरोप देण्यासाठी दहा लाखांहून अधिक इराणी नागरिक जमले आहेत. यावेळी चेंगराचेंरी झाल्याचेही वृत्त आहे. यात 35 जणांचा मृत्यू झाल्याचे एपी या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
सुलेमानींचे पार्थिव ठेवण्यात आलेल्या ताबूतावर इराणचा ध्वज लपेटण्यात आला आहे. तसेच सुलेमानी यांच्यासोबत त्यांचे निकटचे सहकारी असलेल्या ब्रिगेडियर जनरल हुसेन पुरजाफरी यांचेही पार्थिव ठेवण्यात आले आहे. दरम्यान, सुलेमानी यांना इराकची राजधानी असलेल्या बगदाद येथे, तसेच इराणची राजधानी असलेल्या तेहरान येथेही अंत्ययात्रा काढून अखेरचा निरोप देण्यात आला होता. तेहरान येथे सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयतुल्ला खोमेनी हेसुद्धा उपस्थित होते. त्यांनी आखरी नमाज वाचून सुलेमानी यांना निरोप दिला होता.
सुलेमानींना मारणाऱ्या अमेरिकन सैन्यालाच इराणने घोषित केले दहशतवादी
शियांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या इराणच्या प्रयत्नांना सुलेमानींच्या हत्येनं अमेरिकेचा खो
इराण –अमेरिका तणावामुळे भारताची चिंता वाढली, परराष्ट्र मंत्र्यांकडून चर्चा
शुक्रवारी संध्याकाळी कासिम सुलेमानी हे इराकमधील बगदाद विमानतळावर आले असतानाच अमेरिकेने तेथे क्षेपणास्त्र हल्ला केला होता. या हल्ल्यात कासिम सुलेमानी यांच्यासह काही लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. . सुलेमानींचा मृतदेह त्यांच्या अंगठीवरून ओळखण्यात आला. सुलेमानी हे इस्लामिक रिव्होल्यूशनरी सेनेच्या एका ताकदवान विंग 'कदस फोर्स'चे प्रमुख होते.