थायलंडमध्ये अंदाधुंद गोळीबारात २४ बालकांसह ३६ जणांचा मृत्यू; पाळणाघरातील थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 08:24 AM2022-10-07T08:24:33+5:302022-10-07T08:25:03+5:30
थायलंडमधील पाळणाघरात घुसून एका माथेफिरूने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ३६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात तब्बल २४ बालकांचा समावेश आहे.
बँकॉक :थायलंडमधील पाळणाघरात घुसून एका माथेफिरूने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तब्बल २४ बालकांचा समावेश आहे. थायलंडच्या इतिहासातील अंदाधुंद गोळीबाराची ही सर्वात निर्घृण घटना आहे.
या हत्याकांडातील हल्लेखोर पन्या काम्रप हा माजी पोलीस अधिकारी असून, त्याने आपली पत्नी व मुलालाही ठार केले असून, मग स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. पाळणाघरात पन्या काम्रप याने केलेल्या हत्याकांडामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
नॉन्गबुआ लम्फू या शहरातील पाळणाघरामध्ये ही भीषण घटना घडली. पाळणाघराचा बंद दरवाजा तोडून या नराधमाने हे नृशंस कृत्य केले. त्या पाळणाघरातील खोल्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर झळकली आहेत. अंदाधुंद गोळीबारानंतर त्या खोल्यांमध्ये रक्ताचा सडा पडल्याचे छायाचित्रांतून दिसत आहे.
अंगावर काटा आणणारी ही छायाचित्रे पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आपल्या मुलांची हत्या झाल्याने शोकाकुल झालेले त्यांचे आई-वडीलही या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. (वृत्तसंस्था)
शिक्षिकेचीही केली हत्या
पन्या काम्रप हा हल्लेखोर जेव्हा बंदूक घेऊन पाळणाघराच्या दिशेने येताना दिसला तेव्हा तेथील शिक्षकांनी पाळणाघराचा दरवाजा बंद केला. मात्र तरीही हे दार उघडून पन्या काम्रप याने पाळणाघरात घुसखोरी करून बेछूट गोळीबाराला सुरूवात केली. त्यात पाळणाघरातील एक शिक्षिकाही ठार झाली. तिला पन्याने ठार मारले तेव्हा तिच्या हातात दोन बालके होती, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
हँडगन, शॉटगन, चाकूचा केला वापर
पाळणाघरामध्ये हल्ला करण्यासाठी पन्या काम्रप याने हँडगन, शॉटगन व चाकूचा वापर केला. तिथे हत्याकांड घडवून इमारतीच्या बाहेर आल्यानंतर हल्लेखोराने आणखी दोन मुले व इतर नऊजणांना गोळ्या घालून ठार केले. तिथून घरी येऊन त्याने पत्नी व मुलाचीही हत्या केली व त्यानंतर स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली.
लष्करी सेवेतून झाला होता बडतर्फ
- हल्लेखोराने पाळणाघरात २२ बालकांची व दोन कर्मचाऱ्यांचीही हत्या केली. त्यानंतर तो आपल्या कारमध्ये बसला तेव्हा त्याने समोरून येणाऱ्या लोकांवरही गोळीबार केला.
- त्यातही काहीजण ठार झाले. अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या पन्या काम्रप याची यंदाच्या वर्षाच्या प्रारंभी लष्करी सेवेतून हकालपट्टी करण्यात आली होती.
२ वर्षांपूर्वीही थायलंडमध्ये घडले होते हत्याकांड
- अमेरिका, ब्राझिलमध्ये बेछूट गोळीबार होण्याचे प्रकार घडत असतात. मात्र, थायलंडमध्ये अशा प्रकारांचे प्रमाण खूप कमी आहे. थायलंडमध्ये २०१९ साली दर एक लाख लोकांमागे ४ शस्त्रधारी लोक असे प्रमाण आहे.
- अमेरिकेत हे प्रमाण ११ व ब्राझिलमध्ये ते २३ इतके आहे. थायलंडमध्ये २०२० साली एका सैनिकाने मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. त्यात २९ लोक ठार झाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"