मदर ऑफ ऑल बॉम्ब हल्ल्यात 36 दहशतवादी ठार
By admin | Published: April 14, 2017 11:57 AM2017-04-14T11:57:50+5:302017-04-14T11:57:50+5:30
अमेरिकेने अफगाणिस्तानातील ननगरहार भागात जगातील सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्बहल्ला केला.
Next
ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. 14 - इसिसचे तळ उद्धवस्त करण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानातील ननगरहार भागात जगातील सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात इसिसचे 36 दहशतवादी ठार झाले असून त्यांचा संपूर्ण तळ नष्ट झाल्याची माहिती अफगाण संरक्षण मंत्रालयाच्या अधिका-यांनी दिली.
इसिसचे दहशतवादी वापरत असलेले बंकर आणि बोगद्यांना लक्ष्य करण्याच्या इराद्याने 9800 किलो वजनाचा हा बॉम्ब टाकण्यात आला. या स्फोटाची निष्पाप नागरिकांना झळ पोहोचलेली नाही. स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास हा हल्ला केला गेला.
मदर ऑफ ऑल बॉम्ब’ अशी ओळख असणाऱ्या २१ हजार पौंड वजनाच्या या बॉम्बच्या स्फोटाने दहशतवादी जगताला हादरा तर बसलाच, शिवाय अमेरिकेने आपल्या शक्तीचे पुन्हा दर्शन घडविले. ज्या भागात ‘जीबीयू ४३ बी मॅसिव्ह ऑर्डिनेन्स एअर ब्लास्ट’ बॉम्ब टाकण्यात आला तो इसिसचा प्रभाव असलेला परिसर आहे. या हल्ल्याने किती हानी झाली ते स्पष्ट होऊ शकले नाही.
विघातकता किती?
- १ हजार यार्डामध्ये आगीच्या ज्वाळा पसरतात.
- १ मैल परिसरातील लोकांना, इलेक्ट्रॉनिक वस्तू, लाइट्स, वाहने यांना मोठी झळ, हादऱ्याने मृत्यू.
- १.७ मैल परिसरातील लोकांचा धक्क्याने मृत्यू होऊ शकतो. अनेक घरांना/इमारतींना तडे जाऊ शकतात.
- २ मैल परिसरातील लोकांना आवाजाने बहिरेपण येऊ शकते.
- ५ मैल परिसरात भूकंपसदृश धक्के बसतात.
- ३0 मैल परिसरातून या बॉम्बच्या १० हजार फूट उंच पोहोचलेल्या मशरूमच्या आकाराचे धूराचे लोळ दिसतात.
या स्फोटाचे राजकीय जगात परिणाम काय?
- अमेरिकेशी कटुता असणाऱ्या रशियावर मोठा दबाव.
- दक्षिण चीन समुद्रावर दावा करणाऱ्या चीनला इशारा.
- बॉम्बखोर उत्तर कोरियाला अमेरिकेने शक्ती दाखवली.
- दहशतवाद्यांना पाळणाऱ्या पाकिस्तानला मोठा इशारा.