अमेरिकेच्या तीन नागरिकांसह 37 जणांना मृत्युदंड! काय आहे घटना?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 12:19 PM2024-09-14T12:19:23+5:302024-09-14T12:20:42+5:30
37 civilians sentence to death : तीन अमेरिकन नागरिकांसह ३७ जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एका लष्करी न्यायालयाने हा निकाल दिला असून, दोषींमध्ये विदेशातील नागरिकांचा समावेश आहे.
Sentence to Death News : सत्ता उलथवून टाकण्याच्या प्रकरणात दोषी ठरवत लष्करी न्यायालयाने 37 जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. डेमॉक्रटिक ऑफ रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये हे घडले आहे. मे महिन्यात या नागरिकांनी सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण, अपयशी ठरले. दोषी ठरलेल्यांनी शस्त्र घेऊन कांगोची राजधानी किंशासामध्ये असलेल्या राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला होता.
डेमॉक्रटिक ऑफ रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये मे महिन्यात झालेल्या बंडातील आरोपींना लष्करी न्यायालयाने दोषी ठरवले. दोषी नागरिकांनी राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवल्यानंतर लष्कराने कारवाई केली होती. यात या गटाच्या म्होरक्याला मारण्यात आले. हा म्होरक्या अमेरिकन वंशाचा कंगोलियन नेता होता.
शिक्षा झालेले तीन अमेरिकन व्यक्ती कोण?
ख्रिश्चियन मालांगा यांचा मुलगा मार्सेल मालांगा यालाही आरोपी करण्यात आले होते. त्याचबरोबर त्याचे मित्र टायलर थॉमसन आणि ख्रिश्चियन मालांगा व्यावसायिक सहकारी राहिलेले बेन्जामिन जलमेन यांच्याविरोधातही खटला चालवण्यात आला. यात ते दोषी ठरले.
"वडिलांनी मारून टाकण्याची धमकी दिली होती"
तिन्ही अमेरिकन आरोपींना गुन्हेगारी कट, दहशतवाद आणि इतर आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले. लष्करी न्यायालयाने त्यांना मृत्युदंड ठोठावला. मालांगाने न्यायालयात सांगितले की, या कटात सहभागी न झाल्यास माझ्या वडिलांनी मारून टाकण्याची धमकी दिली होती. वडिलांच्या सांगण्यावरून कांगोमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ होती. माझ्या वडिलांना मी अनेक वर्षांपासून भेटलो नव्हतो, असेही त्याने न्यायालयाला सांगितले.
सत्ता उलथवून टाकण्याच्या कटात तीन अमेरिकन व्यक्तींसह जवळपास ५० लोक सहभागी होते. यात ३७ जण दोषी ठरले. दोषींमध्ये ब्रिटिश, कॅनडा, बेल्जियम आणि कांगोमधील नागरिक आहेत. वॉश्टिंगटनमधील स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, या प्रकरणातील सुनावणीमध्ये दूतावासातील अधिकारी सहभागी झाले होते. ते यापुढेही प्रकरणावर लक्ष ठेवून असणार आहेत. कांगोमध्ये कायदा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका करण्याची परवानगी आहे, असेही ते म्हणाले.