जगभरात हिंसेमुळे ३.८ कोटी बेघर
By admin | Published: May 7, 2015 12:59 AM2015-05-07T00:59:52+5:302015-05-07T00:59:52+5:30
सिरिया व युक्रेनसारख्या देशांत झालेल्या हिंसाचारामुळे जगभरात ३.८ कोटी लोकांवर परदेशात विस्थापित होण्याची वेळ आली.
जिनिव्हा : सिरिया व युक्रेनसारख्या देशांत झालेल्या हिंसाचारामुळे जगभरात ३.८ कोटी लोकांवर परदेशात विस्थापित होण्याची वेळ आली. विस्थापितांचे हे प्रमाण न्यूयॉर्क, लंडन व बीजिंग या शहरांच्या एकूण लोकसंख्येएवढी आहे.
येथील आंतरराष्ट्रीय विस्थापित नियंत्रण केंद्राने अहवाल सादर केला आहे. यात १.१ कोटी लोक गेल्या वर्षी विस्थापित झाल्याचे म्हटले आहे. यानुसार, दररोज सरासरी ३० हजार लोकांना घर सोडावे लागते. ‘नॉर्वियन रिफ्युजी काऊन्सिल’चे प्रमुख जॉन एगलँड म्हणाले की, जबरदस्तीने विस्थापित व्हावे लागणाऱ्यांबाबतची ही आकडेवारी खूप चिंताजनक आहे. निर्दोष लोकांच्या सुरक्षेबाबत आमचे नाकर्तेपण यातून दिसून येते.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आकडेवारीनुसार, सुमारे १.६७ कोटी लोकांना शरणार्थी म्हणून जीवन व्यतीत करावे लागत आहे. ही आकडेवारी २०१३ च्या अखेरपर्यंतची होती. (वृत्तसंस्था)