उपेक्षित मुलांसाठी उभारले ४० लाख डॉलर, मुंबईची ‘प्रथम’ सर्वांत मोठी एनजीओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:32 AM2017-09-29T01:32:45+5:302017-09-29T01:33:05+5:30
भारतीय एनजीओ ‘प्रथम’ने भारतातील उपेक्षित मुलांच्या शिक्षणासाठी ४० लाख डॉलरची रक्कम जमा केली आहे. न्यू यॉर्कमध्ये वार्षिक कार्यक्रमात या एनजीओने ही माहिती दिली.
न्यूयॉर्क : भारतीय एनजीओ ‘प्रथम’ने भारतातील उपेक्षित मुलांच्या शिक्षणासाठी ४० लाख डॉलरची रक्कम जमा केली आहे. न्यू यॉर्कमध्ये वार्षिक कार्यक्रमात या एनजीओने ही माहिती दिली. मुंबईतील माधव चव्हाण व फरिदा लांबे यांनी सुरू केलेली ही संस्था आहे.
यातील ३८ लाख डॉलर ‘प्रथम’ संस्थेने उभारले असून २,६०,००० डॉलर अन्य पुरस्कृत शिक्षण कार्यक्रमासाठी जमा केले. ‘प्रथम’ या एनजीओची स्थापना १९९५मध्ये मुंबईत एका वस्तीत झाली. भारतातील सर्वांत मोठ्या बिगर सरकारी संघटनेपैकी ही एक संस्था आहे. संस्थेने दोन दशकांत वंचित वर्गाच्या पाच कोटींहून अधिक मुलांना शिक्षणासाठी मदत
केलेली आहे. त्यांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला आहे. (वृत्तसंस्था)
सहकार्याची प्रशंसा
या संस्थेच्या सीईओ रुक्मिणी बॅनर्जी यांनी डिजिटल शिक्षणासाठी गुगलच्या सहकार्याची प्रशंसा केली. २१ सप्टेंबर रोजी शिकागोत एका कार्यक्रमात बोलताना ‘जेनपॅक्ट’चे अध्यक्ष आणि सीईओ एन.व्ही. त्यागराजन यांनी मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व विशद केले. जर तुम्ही मुलींना शिक्षित केले तर समाज बदलतो. समाजाचा सामाजिक व सांस्कृतिक पाया बदलण्याची ताकद महिलांमध्ये असते, असे ते म्हणाले.