इराकमध्ये ४० भारतीयांचे अपहरण ?
By admin | Published: June 18, 2014 09:34 AM2014-06-18T09:34:34+5:302014-06-18T10:55:41+5:30
इराकमध्ये दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा फटका आता भारतीयांनाही बसू लागला आहे. मोसूल येथे एका प्रकल्पावर काम करणा-या ४० भारतीयांची दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचे वृत्त आहे.
Next
>ऑनलाइन टीम
बगदाद, दि. १८- इराकमध्ये दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा फटका आता भारतीयांनाही बसू लागला आहे. मोसूल येथे एका प्रकल्पावर काम करणा-या ४० भारतीयांची दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचे वृत्त आहे. मात्र या सर्वांशी सध्या संपर्क होत नसून ते बेपत्ता झाले आहेत अशी सावध प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
इराकमध्ये शिया सरकार व सुन्नी जिहाद्यांमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून यामुळे इराकमधील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. इस्लामिक स्टेट इन इराक अँड अल -शाम (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेने अनेक शहरांवर ताबा मिळवला आहे. तेल विहीरींची नैसर्गिक देणगी लाभलेल्या मोसूल शहरावरही आयएसआएस या संघटनेने ताबा मिळवला आहे. मोसूलमध्ये भारतातील ४० कर्मचारी एका बांधकाम साईटवर काम करत होते. यासर्वांचे दहशतवाद्यांनी अपहरण झाल्याचे इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. मात्र या नागरिकांशी अद्याप संपर्क झालेला नसून ते बेपत्ता आहे. त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे परराष्ट्रमंत्रालयाच्या अधिका-यांनी सांगितले.
दरम्यान, भारतीय नागरिकांच्या अपहरणाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसून अपह्रत नागरिकांच्या सुटकेसाठी कोणती मागणीही करण्यात आलेली नाही.