एकाच झाडाला ४० प्रकारची फळे
By admin | Published: July 26, 2015 11:35 PM2015-07-26T23:35:32+5:302015-07-26T23:35:32+5:30
भारतीय पुराणातील कल्पवृक्ष असो की ज्यू पुराणातील कबाला, ख्रिश्चन धर्मातील यू व बुद्ध धर्मातील बोधीवृक्ष विविध पुराणांत वा प्राचीन कथांत
वॉशिंग्टन : भारतीय पुराणातील कल्पवृक्ष असो की ज्यू पुराणातील कबाला, ख्रिश्चन धर्मातील यू व बुद्ध धर्मातील बोधीवृक्ष विविध पुराणांत वा प्राचीन कथांत आलेली विद्वत्तेच्या वृक्षाची ही नावे, असा वृक्ष कधी अस्तित्वात असेल याची कल्पनाही कोणी केली नसेल; पण संपत्ती, समृद्धी व ज्ञान यांचे प्रतीक ठरलेला एक वृक्ष अमेरिकेत जोपासण्यात आला असून ट्री आॅफ ४० असे त्याचे नाव आहे. सॅम वान अकेन या प्राध्यापक व सुशिक्षित शेतकऱ्याने हा वृक्ष जोपासला आहे. सिराकस विद्यापीठात प्राध्यापक व स्वयंघोषित शेतकरी अशी अकेन यांची ओळख आहे. त्यांनी तयार केलेला हा वृक्ष एकाचवेळी ४० प्रकारची फळे देतो असा त्यांचा दावा आहे. प्लम, पीच, अॅप्रिकॉट, चेरी, नेक्ट्रीन अशी फळे या वृक्षावर लगडतात. प्राध्यापक व्हान अॅकेन यांनी या वृक्षाचे नाव ट्री आॅफ ४० असे ठेवले आहे. बायबलमध्ये ४० हा आकडा समृद्धीचे प्रतीक म्हणून आला आहे. म्हणून अॅकेन यांनी या वृक्षाचे नाव ट्री आॅफ ४० असे ठेवले आहे.
त्यांच्या दृष्टीने शास्त्रीय प्रयोगापेक्षा ही एक कला आहे. ट्री ४० लावून काही वर्षे झाली आहेत आणि अशा प्रकारचे किमान १२ वृक्ष अमेरिकेत आहेत; पण प्रा. अॅकेन यांनी आपल्या ट्री ४० ची गोष्ट न्यू नॅशनल जिआॅग्राफिकवर चित्रफितीच्या माध्यमातून सादर केली असून, त्यामुळे या प्रयोगाला नवा उजाळा मिळाला आहे.
त्यांच्या या वृक्षावर वेगवेगळी फळे वेगवेगळ्या वेळी फळतात, संपूर्ण उन्हाळाभर हे चक्र चालू असते; पण एकाचवेळी सर्व फळे दिसली तर मग खराच आश्चर्यजनक प्रयोग होईल, असे अॅकेन म्हणतात. अॅकेन यांना असा वृक्ष तयार करून देण्यासाठी मागण्याही येत असून, एका वृक्षाची किंमत ३० हजार डॉलर आहे.