पाकिस्तानमध्ये 40 दहशतवादी संघटना सक्रिय, इम्रान खान यांचा कबुलीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 10:50 AM2019-07-24T10:50:25+5:302019-07-24T10:50:56+5:30
पाकिस्तानमध्ये जवळपास 40 दहशतवादी संघटना सक्रिय आहे.
वॉशिंग्टनः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पाकिस्तानमध्ये दहशतवादाला खतपाणी मिळत असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य केलं आहे. पाकिस्तानमध्ये जवळपास 40 दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. पाकिस्तानच्या आधीच्या सरकारांनी गेल्या वर्षांत अमेरिकेला ही गोष्ट सांगितली नाही. अमेरिकेतल्या जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. पाकिस्तानचा 9/11 हल्ल्याशी काहीही संबंध नाही.
अल कायदा अफगाणिस्तानमध्ये सक्रिय होती. पाकिस्तानमध्ये कोणतेही तालिबानी दहशतवादी राहत नाहीत. आम्ही अमेरिकेला खऱ्या गोष्टींपासून अनभिज्ञ ठेवलं, त्यासाठी मी पाकिस्तान सरकारला जबाबदार धरतो. 40 वेगवेगळ्या दहशतवादी संघटना पाकिस्तानात सक्रिय आहेत. त्यामुळेच पाकिस्तानला अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. जेव्हा अमेरिका दहशतवादाविरोधात युद्ध लढण्यासाठी आमची मदत मागत होता. तेव्हा आम्ही पाकिस्तानच्याच अस्तित्वाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो.
मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अन्य अमेरिकी नेत्यांची भेट घेतली आहे. द्विपक्षीय संबंध हे एकमेकांवरच्या विश्वासावर अवलंबून असतात. पाकिस्तान शांती प्रक्रियेत सहभागी असल्याचं आम्ही अमेरिकेला आश्वासन दिलं आहे. आम्ही तालिबान्यांचीही मनधरणी करत आहोत. परंतु ही समस्या लागलीच सुटणारी नाही. अफगाणिस्तानची परिस्थिती फारच गुंतागुंतीची आणि जटील झाली आहे. तरीही आम्ही अफगाणिस्तानमध्ये शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करू. पाकिस्तानची सेना, सुरक्षा बल आणि सर्वच माझ्या पाठीमागे आहेत. अफगाणिस्तानमध्ये कायमची शांतता पसरावी, यासाठी आम्ही कायमच प्रयत्न करत राहू, असं इम्रान खान म्हणाले आहेत.