ताशी ४०० किमी धावणारी बुलेट ट्रेन
By admin | Published: June 27, 2017 01:42 AM2017-06-27T01:42:05+5:302017-06-27T01:42:05+5:30
तासाला कमाल ४०० किमी वेगाने धावू शकणाऱ्या चीनच्या अत्यंत प्रगत अशा देशी बनावटीच्या नव्या बुलेट ट्रेनने बीजिंग ते शांघाय
बीजिंग : तासाला कमाल ४०० किमी वेगाने धावू शकणाऱ्या चीनच्या अत्यंत प्रगत अशा देशी बनावटीच्या नव्या बुलेट ट्रेनने बीजिंग ते शांघाय या सवार्धिक गर्दीच्या रेल्वेमार्गावर सोमवारी पहिली सफर यशस्वी केली.
सरकारी शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सीआर४०० एएफ मॉडेलची ‘फुशिंग’ नावाची ही गाडी स. ११.०५ वाजता बीजिंगमधील दक्षिण रेल्वे स्थानकातून शांघायसाठी रवाना झाली. याच वेळी अशाच प्रकारची दुसरी बुलेट ट्र्ेन शांघायमधील हाँगक्विआओ स्थानकातून बिजींगसाठी सुटली. वाटेत १० स्थानकांवर थांबे घेत या दोन्ही गाड्या पाच तास ४५ मिनिटांत आपापल्या गंतव्य स्थानी पोहोचल्या. या दोन शहरांमधील अंतर १,२१४ किमी आहे.
मुंबईतील लोकल गाड्यांप्रमाणे या बुलेट ट्र्ेनला ‘इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट’ (ईएमयू) म्हणूनही ओळखले जाते. ही बुलेट ट्रेन ताशी ४०० किमी एवढ्या कमाल वेगाने धावू शकते व तिचा नेहमीचा सरासरी वेग ताशी ३५० किमी असतो.
बीजिंग-शांघाय हा चीनमधील सर्वाधिक गर्दीचा रेल्वेमार्ग असून त्यावर दररोज पाच लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करत असतात. ‘फुशिंग’ म्हणजे पुनरुज्जीवन असे चपखल नाव धारण करणाऱ्या या बुलेट ट्रेनने या मार्गावरील प्रवासाचे एक नवे युग सुरु केले. चायना रेल्वे कॉर्पोरेशन ही सरकारी कंपनी ही बुलेट ट्र्ेन चालविते. (वृत्तसंस्था)