४२ दिवसांत एकट्याने पूर्ण केली पृथ्वीची सागरी परिक्रमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:08 AM2017-12-18T01:08:41+5:302017-12-18T01:08:50+5:30
फ्रँकॉई गेबार्ट या फ्रेंच नाविकाने न थांबता एकट्याने पृथ्वीची सागरी परिक्रमा सर्वात कमी वेळात पूर्ण करण्याचा नवा विश्वविक्रम रविवारी प्रस्थापित केला.
ब्रेस्ट (फ्रान्स): फ्रँकॉई गेबार्ट या फ्रेंच नाविकाने न थांबता एकट्याने पृथ्वीची सागरी परिक्रमा सर्वात कमी वेळात पूर्ण करण्याचा नवा विश्वविक्रम रविवारी प्रस्थापित केला.
फ्रँकॉईने ही प्रदक्षिणा ४२ दिवस, १६ तास, ४० मिनिटे व ३५ सेकंदात पूर्ण केली. याआधीचा विक्रम फ्रान्सच्याच थॉमस कोविले यांनी गेल्या वर्षी केला होता. फ्रँकॉईने सहा दिवस व १० तासांचा कमी वेळ घेऊन त्यांचा विक्रम सहज मोडला.
फ्रान्सच्या वायव्य टोकाजवळ असलेले उशांत बेट आणि इंग्लंडच्या नैऋत्येस असलेला लिझार्ड पॉर्इंट यांच्या दरम्यान या सागरी पृथ्वी परिक्रमेच्या समाप्तीची काल्पनिक रेखा ठरविण्यात आली होती. ३४ वर्षांच्या फ्रँकॉई यांनी ब्रिटिश प्रमाण वेळेनुसार रविवारी पहाटे १.४५ वाजता समाप्तीरेषा पार केली.
‘वर्ल्ड सेलिंग स्पीड कौन्सिल’च्या निरीक्षकाने फ्रँकॉई यांनी परिक्रमेसाठी घेतलेल्या वेळेची घोषणा केली. बोटीतील ब्लॅक बॉक्स आणि जीपीएस डेटाशी पडताळणी केल्यानंतर या वेळेची नंतर अधिकृत पुष्टी केली जाईल. दोन मुलांचा पिता असलेल्या फ्रँकॉई यांनी ३०मीटर लांबीच्या अत्याधुनिक ‘मॅक्सी-ट्रायमरान’ बोटीतून ही सागरी सफर केली.
खासकरून प्रशांत महासागरातील अत्यंत खडतर आणि सर्वाधिक लांबीच्या प्रवासात नशिबासोबतच चांगले हवामान व उपयुक्त वाºयांची साथ मिळाल्याने त्यांना हा विक्रम करणे शक्य झाले. या सफरीत त्यांनी एकाकी सागरी सफरीचे अनेक नवे उच्चांकही प्रस्थापित केले. यात सर्वात कमी वेळात प्रशांत महासागर पार करणे ( सात दिवस, १५ तास व १५ मिनिटे) व २४ तासांत सर्वाधिक अंतर कापणे (८५१ मैल) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
प्रवासात ३० दिवसांची घट-
या प्रकारच्या स्पर्धात्मक सागर सफरीची सुरुवात
सन २००४ मध्ये झाल्यापासून प्रवासाचा वेळ
सुमारे ३० दिवसांनी कमी झाला आहे.