बँकेला ४,२०० कोटी दंड
By admin | Published: February 1, 2017 01:57 AM2017-02-01T01:57:25+5:302017-02-01T01:57:25+5:30
काळा पैसा पांढरा करण्याच्या (मनी लॉन्ड्रिंग) रशियात केल्या गेलेल्या व्यवहारांबद्दल डॉएच्च बँक या बलाढ्य जर्मन बँकेला अमेरिका व ग्रेट ब्रिटन या दोन्ही देशांनी मिळून
न्यूयॉर्क : काळा पैसा पांढरा करण्याच्या (मनी लॉन्ड्रिंग) रशियात केल्या गेलेल्या व्यवहारांबद्दल डॉएच्च बँक या बलाढ्य जर्मन बँकेला अमेरिका व ग्रेट ब्रिटन या दोन्ही देशांनी मिळून सुमारे ४,२२१ कोटी रुपये एवढा दंड ठोठावला असल्याचे न्यूयॉर्क राज्याच्या वित्त विभागाने जाहीर केले.
यापैकी ४२५ दशलक्ष डॉलर दंड न्यूयॉर्क राज्याने तर १६३ दशलक्ष डॉलरचा दंड ब्रिटनच्या फिनान्शियल कन्डक्ट अॅथॉरिटीने ठोठावला आहे. बँकेच्या मॉस्को, लंडन व न्यूयॉर्क येथील कार्यालयांमधून ‘मिरर ट्रेड’ म्हणून ओळखले जाणारे शेअरचे अवैध व्यवहार करून डॉएच्च बँकेने रशियातून १० अब्ज डॉलर बेकायदा बाहेर पाठविल्याबद्दल ही दंडाची कारवाई करण्यात आली. पूर्वसूचना देऊनही बँक अवैध व्यवहारांना अटकाव करू शकली नाही, असा ठपका ठेवला असून यापुढ बँकेने हे काम त्रयस्थ संस्थेकडून करून घ्यावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)