आयएसकडून ४३ शांती सैनिकांचे अपहरण
By admin | Published: August 30, 2014 03:29 AM2014-08-30T03:29:12+5:302014-08-30T03:29:12+5:30
आयएसच्या दहशतवाद्यांनी गोलान हाईटस्मधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) ४३ शांती सैनिकांचे अपहरण केल्याचे वृत्त आहे
संयुक्त राष्ट्रसंघ : आयएसच्या दहशतवाद्यांनी गोलान हाईटस्मधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) ४३ शांती सैनिकांचे अपहरण केल्याचे वृत्त आहे. अपहृत शांती सैनिक फिजीचे आहेत, असे युनोचे प्रवक्ते स्टिफाने दुजारिक यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
इस्रायल सीमेजवळील गोलान हाईटस् भागात आयएस दहशतवादी व सिरियन सैन्यदलातील धुमश्चक्रीदरम्यान या शांती सैनिकांचे अपहरण करण्यात आले. सिरिया आणि इस्रायलदरम्यान शस्त्रसंधी लागू करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने १९७४ मध्ये गोलान हाईटस् येथे शांती सैनिकांची तैनाती केली होती. हा भाग इस्रायलने १९६७ मध्ये ताब्यात घेतला होता. आयएसने गुरुवारी युनोच्या ४३ शांती सैनिकांचे अपहरण करतानाच ८१ शांती सैनिकांची चहूकडून कोंडी केली आहे. हे शांती सैनिक फिलीपाईन्सचे आहेत. २०११ मध्ये सिरियात उफाळलेल्या यादवीची शांती सैनिकांना झळ बसू लागल्यामुळे काही दिवसांपूर्वीच फिलीपाईन्सने गोलान हाईटस्मधील आपले ३३१ शांती सैनिक काढून घेणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर ही घटना घडली. गेल्या सप्टेंबरमध्ये फिलीपाईन्सच्या २१ शांती सैनिकांचे सिरियन बंडखोरांनी अपहरण केले होते; मात्र आठवडाभरात त्यांची सुटका करण्यात आली होती.
आयएसने अपहृत सिरियन सैनिकांचे हत्याकांड घडवून आणल्याच्या पार्श्वभूमीवर अपहृत शांती सैनिकांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
आयएसने पकडलेल्या शांती सैनिकांची सुखरूप सुटका घडवून आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ प्रयत्नशील आहे, असेही दुजारिक यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)