अफगाणिस्तानमधल्या हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 43 जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 11:21 PM2018-01-21T23:21:48+5:302018-01-21T23:22:48+5:30
बंदुकधा-यांनी सहा मजली अालिशान हॉटेलवर शनिवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एका विदेशी महिलेसह 43 जण ठार झाले आहेत, तर आठ जखमी झालेत. 12 तास चाललेल्या या संघर्षामुळे नागरिक भयभीत झाले होते.
अफगाणिस्तान : काबूलमध्ये बंदुकधा-यांनी सहा मजली अालिशान हॉटेलवर शनिवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एका विदेशी महिलेसह 43 जण ठार झाले आहेत, तर आठ जखमी झालेत. 12 तास चाललेल्या या संघर्षामुळे नागरिकांचा भीतीनं थरकाप उडाला आहे. या हल्ल्यातून 40 विदेशी नागरिकांसह 150 जणांची सुरक्षितरीत्या सुटका करण्यात आली असली तरी जवळपास 43 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. हॉटेलच्या काही भागाला आगही लागली होती.
या हल्ल्याची जबाबदारी तालिबाननं स्वीकारली आहे. इमारतीच्या वर अडकलेल्या लोकांनी बेडशीट्सच्या गाठी बांधून त्या आधारे बाल्कनीत आश्रय घेतला. या प्रयत्नांत एक जण निसटून पडला. विशेष दलांचे जवान हेलिकॉप्टर्सच्या साह्याने इमारतीच्या गच्चीवर उतरवण्यात आले. जवळपास तासभर चाललेल्या या संघर्षात अफगाण सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.