भारतात गेल्या ५० वर्षांत ४.५ कोटी मुली झाल्या ‘गायब’; गर्भलिंग चिकित्सा व ‘नकोशी’चा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 03:52 AM2020-07-01T03:52:34+5:302020-07-01T06:53:37+5:30
संयुक्त राष्ट्रांचा अहवाल : पाच वर्षांपूर्वीच मृत्युमुखी पडणाऱ्या मुलींचे प्रमाण भारतात सर्वाधिक
संयुक्त राष्ट्रे : गेल्या ५० वर्षांत भारतात ४.५ कोटींहून अधिक मुली ‘गायब’ झाल्या आहेत, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. लैंगिक आरोग्य आणि प्रजनन याविषयी काम करणाºया संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीचा (यूएनएफपीए) ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन-२०२०’ हा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यात जगभरातील ‘गायब’ झालेल्या मुलींचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
अहवालात अशा मुलींना ‘मिसिंग फिमेल्स’ असे संबोधण्यात आले आहे. अशा ‘मिसिंग फिमेल्स’ची गणना दोन पद्धतीने करण्यात आली आहे. एक म्हणजे एरव्ही ज्या जन्माला आल्या असत्या परंतु गर्भलिंग चिकित्सा करून मातेने गर्भपात करून घेतल्याने जन्मालाच येऊ न शकलेल्या मुली. दुसरे म्हणजे, जन्माला आल्यावर ‘नकोशी’पणाची व पक्षपाती वागणूक दिली गेल्याने बालवयातच मृत्यू पावलेल्या मुली.
अहवाल म्हणतो की, गेल्या ५० वर्षांत लोकसंख्येतून ‘गायब’ होणाºया मुलींची जगभरातील संख्या दुपटीने वाढून १९७० मधील सहा कोटींवरून आता १४.२६ कोटींपर्यंत पोहोचली आहे. अशा ४.५ कोटी मुली भारतात व ७.२३ कोटी मुली चीनमध्ये ‘गायब’ झाल्या आहेत.
अहवालात पुढे असेही नमूद करण्यात आले की, २०१३ ते २०१७ या काळात दरवर्षी सरासरी ४.६० लाख मुली जन्माच्या आधीच किंवा त्यानंतर लगेचच ‘गायब’ होत राहिल्या. यापैकी दोन तृतीयांंश मुली गर्भलिंग चिकित्सेनंतर करून घेतलेल्या गर्भपातामुळे जन्मालाच आल्या नाहीत. राहिलेल्या एक तृतीयांश मुलींचे बालवयातच मृत्यू झाले.
चीन आणि भारत या दोन देशांमध्ये दरवर्षी जगातील सर्वात जास्त अपत्ये जन्माला येतात. मात्र दरवर्षी जगात १२ ते १५ लाख मुलींच्या गर्भांचे गर्भपात करून घेतले जातात. गर्भाच्या लिंगामुळे केले जाणारे असे ९० ते ९५ टक्के गर्भपात भारत व चीनमध्ये होतात.
जन्माला येणाºया मुलींचे जिणेही ‘नकोशी’पणामुळे कसे नकोसे होते, हे सांगताना अहवाल म्हणतो की, जन्मत:च किंवा पाच वर्षांच्या होण्याआधीच मृत्यू पावणाºया मुलींचे भारतातील दरहजारी १३.५ हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. यावरून असे दिसते की, जन्माला येणाºया नऊ मुलींपैकी एक मुलगी ‘नकोशी’ झाल्याने बालवयातच मरण पावते.
अहवाल म्हणतो की, समाजातील लैंगिक गुणोत्तराचे प्रमाण बिघडण्याचा परिणाम स्वाभाविकच विवाहसंस्थेवर होईल. मुलांच्या तुलनेत मुली कमी असल्याने अनेक मुलांना विवाहासाठी वधूच न मिळाल्याने त्यांना वय खूप वाढेपर्यंतही अविवाहितच राहावे लागेल. या असंतुलनाचा सर्वात जास्त फटका समाजातील गरीब व दुर्बल वर्गांना सोसावा लागेल. एका अंदाजानुसार भारतात अशी अविवाहित घोडनवरदेवांची समस्या २०५० च्या सुमारास शिगेला पोहोचेल. त्यावेळी वयाच्या ५० वर्षांपर्यंतही, मुलगी न मिळाल्याने, लग्न न झालेल्या मुलांचे प्रमाण त्यांच्या एकूण संख्येच्या १० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकेल.