४५ मृत भारतीयांची ओळख पटली; आगीची सखोल चौकशी करणार, कुवैत सरकारची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 06:59 AM2024-06-14T06:59:40+5:302024-06-14T06:59:47+5:30
Kuwait Fire: कुवैतमधील अग्निकांडात मरण पावलेल्यांपैकी ४५ भारतीय व फिलिपाईन्सच्या तीन नागरिकांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. या दुर्घटनेत ४९ जणांना जीव गमवावा लागला. त्यापैकी एका व्यक्तीच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही, असे कुवैत सरकारने सांगितले.
दुबई - कुवैतमधील अग्निकांडात मरण पावलेल्यांपैकी ४५ भारतीय व फिलिपाईन्सच्या तीन नागरिकांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. या दुर्घटनेत ४९ जणांना जीव गमवावा लागला. त्यापैकी एका व्यक्तीच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही, असे कुवैत सरकारने सांगितले.
मृतदेह लवकरात लवकर भारतात नेता यावेत, यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी सांगितले. या दुर्घटनेत मरण पावलेल्या केरळमधील नागरिकांच्या वारसदारांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला आहे. उद्योगपती एम. ए. युसूफ, रवी पिल्लई हे सुद्धा मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ५ लाख रुपये व जखमींना २ लाख रुपयांची मदत देणार आहेत.
भारतीय हवाई दलाचे विमान सज्ज
nमरण पावलेल्यांची डीएनए चाचणी करण्यात येत आहे. त्यांचे मृतदेह भारतात नेण्यासाठी भारतीय हवाई दलाचे एक विमान सज्ज ठेवण्यात आले आहे.
nभारतीयांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, या आगीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णयही कुवैत सरकारने घेतला आहे.
पाण्याच्या टाकीत उडी मारून प्राण वाचविले
कासारगोड : कुवैत येथील मंगाफ येथे बांधकाम कामगारांचे वास्तव्य असलेल्या इमारतीला आग लागल्यानंतर तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नलिनाक्षन या कामगाराने आपला जीव बचावण्यासाठी एक धाडस केले. त्यांनी जवळच्याच पाण्याच्या टाकीत उडी मारली. त्यामुळे आगीपासून रक्षण होऊन त्यांचे प्राण वाचले. नलिनाक्षन हे केरळच्या तिक्करीपूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत.