कॅन्सर नसतानाही केमो देणा-या अमेरिकी डॉक्टरला ४५ वर्षांची शिक्षा
By admin | Published: July 11, 2015 09:17 AM2015-07-11T09:17:21+5:302015-07-11T09:17:21+5:30
कर्करोग झालेला नसतानाही केमोथेरपी किंवा अन्य घातक औषधे देऊन रुग्णांच्या जीवाशी खेळणा-या अमेरिकेतील नराधम डॉक्टरला न्यायालयाने ४५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
Next
>ऑनलाइन लोकमत
डेट्रॉईट (अमेरिका), दि. ११ - कर्करोग झालेला नसतानाही केमोथेरपी किंवा अन्य घातक औषधे देऊन रुग्णांच्या जीवाशी खेळणा-या अमेरिकेतील नराधम डॉक्टरला न्यायालयाने ४५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. डॉ. फरीद फाटा असे या डॉक्टरचे नाव असून गरज नसताना महागडी औषधे देणे, कर्करोग झालेला नसतानाही औषधे देणे अशा प्रकारचे एकूण १३ आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले होते. या देशाच्या इतिहासामधला मेडिकेअर घोटाळ्यामधला हा सगळ्यात जास्त हीन घोटाळा असल्याचा सुनावताना न्यायाधीशांनी रुग्णांना माणसासारखे नाही तर पैसा कमावण्याची मशिन्स असल्यासारखे वागवल्याचे म्हटले आहे.
जवळपास ५५३ रुग्णांना आवश्यकता नसलेले कर्करोगाचे उपचार करत वैद्यकीय विमा कंपन्यांकडून या नराधम डॉक्टरने १७.६ दशलक्ष डॉल्रर्स उकळले आहेत. कोर्टामध्ये आरोप सिद्ध झाल्यानंतर डॉ. फरीद फाटाने या सगळ्या कृतीची शरम वाटत असल्याचे सांगत माफीही मागितली. मी हा पेशा स्वीकारताना घेतलेल्या शपथेचा भंग केलाच तसेच माझ्या रुग्णांनाही फसवल्याचे त्याने मान्य केले. रुग्णांचे झालेले नुकसान मी कसे भरून काढणार अशी अपराधी बावनाही त्याने व्यक्त केली.
अर्थात, डझनावारी रुग्णांच्या कुटुंबियांनी कोर्टामध्ये दाद मागितल्यावरच हा सगळा प्रकार उघडकीस आला. एका रुग्णाच्या पत्नीने शेवटच्या श्वासापर्यंत पतीचा अमानुष छळ झाल्याची कहाणी ऐकवली. एकाने तर सांगितले की, मला कर्करोग झालाच नव्हता पण मला अडीच वर्ष केमोथेरपी देण्यात आली. मी या डॉक्टरचा असा काय गुन्हा केला होता की त्यानं माझ्याशी असं वागावं असा प्रश्न गांजलेल्या रॉबर्ट सोबायरे या रुग्णाने विचारला.
सगळ्या रुग्णांच्या जबानीतून असे आढळले की रुग्णांनी ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा फाटाने घेतला आणि त्यांना पैसा कमावून देणारी मशिन्स बनवली. आता ४५ वर्षांची शिक्षा झालेल्या फाटाला किंमान ३४ वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत.