पुढच्या वर्षीपासून चंद्रावर सुरु होणार 4 जी नेटवर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2018 12:19 PM2018-03-01T12:19:20+5:302018-03-01T12:19:56+5:30
जगातील अनेक भाग अजूनही 4 जी नेटवर्कच्या सुविधेपासून वंचित आहेत. पण पुढच्यावर्षापासून चंद्रावर 4 जी नेटवर्कची सेवा चालू होणार आहे.
नवी दिल्ली - जगातील अनेक भाग अजूनही 4 जी नेटवर्कच्या सुविधेपासून वंचित आहेत. पण पुढच्यावर्षापासून चंद्रावर 4 जी नेटवर्कची सेवा चालू होणार आहे. चंद्रावर 4 जी नेटवर्क उभारण्यासाठी व्होडाफोन आणि नोकिया या दोन कंपन्या एकत्र आल्या आहेत.
व्होडाफोनच्या लंडन मुख्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. बर्लिन स्थित एका खासगी स्पेस कंपनीची चंद्रावर लँडर आणि दोन रोव्हर पाठवण्याची योजना आहे. या मिशनसाठी चंद्रावर 4 जी नेटवर्क उभारण्यात येणार आहे. एलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे हे रोव्हर चंद्रावर पाठवण्यात येतील.
चंद्रावरच्या 4 जी नेटवर्कसाठी नोकिया स्पेस ग्रेड अल्ट्रा कॉम्पॅक्ट नेटवर्कची निर्मिती करणार आहे. हे अत्यंत हलक्या वजनाचे उपकरण असेल. एक किलोच्या साखरेच्या पिशवी इतके या उपकरणाचे वजन असेल अशी कंपनीने माहिती दिली आहे.
या नेटवर्कमुळे लँडर चंद्राच्या पुष्ठभागावरुन लाईव्ह व्हिडिओ प्रसारीत करेल जो पृथ्वीवरच्या प्रेक्षकांना पाहता येईल तसेच लँडर आणि रोव्हरमध्ये संवाद (कम्युनिकेश) प्रस्थापित होईल. यापूर्वी चंद्रावर संशोधन करताना कम्युनिकेशनसाठी अॅनालोग्यु रेडिओचा वापर व्हायचा. त्यामध्ये मोठया प्रमाणावर ऊर्जा खर्च व्हायची.