Afghanistan Taliban Crisis : काबुल विमानतळावर गोळीबार, ५ जण ठार; चीनने दिली पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 03:50 PM2021-08-16T15:50:43+5:302021-08-16T16:15:20+5:30
Afghanistan Taliban Crisis : विमानतळावरील अफगाण नागिराकांची प्रचंड गर्दी झाल्यानं अमेरिकन लष्करानं हवेत गोळीबार केल्याचं समोर आलं. अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या गोळीबारामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं भयंकर वातावरण तयार झालं आहे. तेथे प्रत्येकजण देश सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. विमानतळावरील अफगाण नागिराकांची प्रचंड गर्दी झाल्यानं अमेरिकन लष्करानं हवेत गोळीबार केल्याचं समोर आलं. अमेरिकेच्या लष्कराने केलेल्या गोळीबारामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अमेरिकेनं काबूल विमानतळाचा ताबा घेतला आहे. या तणावपूर्ण परिस्थितीत चीनने सोमवारी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. चीनने अफगाणिस्तानच्यातालिबानशी 'मैत्रीपूर्ण संबंध' विकसित करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.
अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर अवघ्या ६ दिवसांमध्ये अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवला आहे. तालिबानानं रविवारी जलालाबाद आणि काबूल शहरावर ताबा मिळवला. तालिबानाच्या सत्तेत राहण्याची मानसिकता नसलेले नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडताना दिसत आहेत. काबुल विमानतळावर अफगाण नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याचं समोर आलं होतं. गर्दी पांगवण्यासाठी अमेरिकेच्या सैनिकांनी हवेत गोळीबार केल्याची बातमी समोर आली होती. देश सोडून जाण्यासाठी काबूल विमानतळावर हजारो नागरिकांची गर्दी जमली होती. विमान सेवा मर्यादित असल्याने गोंधळाचं वातावरण होतं.
At least 5 people were killed in Kabul airport as hundreds of people tried to forcibly enter planes leaving Kabul, witnesses: Reuters
— ANI (@ANI) August 16, 2021
हजारो अफगाण नागरिक सुरक्षिततेच्या कारणास्तव देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर जमा झाल्याचे फोटो, व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. गर्दी पांगवण्यासाठी अमेरिकेच्या सैनिकांनी हवेत गोळीबारही केला होता. मात्र आता विमानतळाचं कामकाज बंद करण्यात आलं आहे. अमेरिकन सैन्याने काढता पाय घेतल्यानंतर जवळपास संपूर्ण देश ताब्यात घेणाऱ्या तालिबाननं अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलवरही आक्रमण केलं होतं. दरम्यान, तालिबानचे दहशतवादी काबुलच्या सीमेमध्ये घुसले आहेत. तसेच या दहशतवाद्यांनी सर्व बॉर्डर क्रॉसिंगवर कब्जा केला असल्याचं यापूर्वी एपीने प्रसारित एका अफगाण अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितलं होतं. दरम्यान, आता अफगाणिस्तानचेराष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली आहे. टोलो न्यूजनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. दरम्यान, अशरफ गनी हे तझाकिस्तानला रवाना झाल्याची माहिती सरकारमधील एका मंत्र्यानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.