पाकच्या हवाई हल्ल्यात ५० अतिरेक्यांचा खात्मा
By admin | Published: June 16, 2014 03:54 AM2014-06-16T03:54:54+5:302014-06-16T03:54:54+5:30
पाकिस्तानी लढाऊ विमानांनी रविवारी उत्तर वजिरीस्तानात केलेल्या हल्ल्यांत ५० अतिरेकी मारले गेले.
इस्लामाबाद : पाकिस्तानी लढाऊ विमानांनी रविवारी उत्तर वजिरीस्तानात केलेल्या हल्ल्यांत ५० अतिरेकी मारले गेले. यापैकी बहुतांश उझबेकिस्तानचे असून कराची आंतरराष्ट्रीय विमानतळ हल्ल्यातील एका सूत्रधाराचाही त्यामध्ये समावेश आहे.
उत्तर वजिरीस्तानच्या देगापन व दत्ता खेल भागात सकाळी करण्यात आलेल्या हल्ल्यात उझबेक अतिरेक्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य बनविण्यात आले. हे दहशतवादी विमानतळ हल्ल्याशी संबंधित होते, असे लष्कराच्या एका निवेदनात म्हटले आहे.
या हल्ल्यांत ५० दहशतवादी मारले गेले असून स्फोटकांचा एक साठाही नष्ट करण्यात आला. डॉनने कराची विमानतळ हल्ल्याचा कट रचणारा सूत्रधारही यात मारला गेल्याचे वृत्त दिले आहे. काही वृत्तांत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या १०० असल्याचे म्हटले आहे; मात्र त्यास दुजोरा मिळू शकला नाही. एक्स्प्रेस ट्रीब्यूनच्या वृत्तानुसार, लढाऊ विमानांनी बॉम्बहल्ले केल्यामुळे सामान्य नागरिकही मारले गेल्याची भीती व्यक्त होत असून यात महिला आणि मुलांचा समावेश असू शकतो.
या हवाई हल्ल्यांच्या एक आठवडा आधी १० उझबेक अतिरेक्यांनी कराची विमानतळावर हल्ला केला होता. दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी १३ तास चाललेल्या कारवाईत दहा दहशतवाद्यांसह ३७ जण मारले गेले होते. विमानतळावरील हल्ल्यानंतर पाकवर दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईसाठी दबाव वाढत चालला आहे. मंगळवारी पाकच्या जेट विमानांनी उत्तर वजिरीस्तानच्या आदिवासी भागातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांना लक्ष्य बनविले होते. यात २५ दहशतवादी मारले गेले होते. त्या दिवशी अमेरिकेनेही उत्तर वजिरीस्तानात ड्रोन हल्ले केले होते. यात १६ दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. (वृत्तसंस्था)