ओमायक्रॉन डेल्टापेक्षा ५० टक्के कमी घातक; रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या घटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 07:16 AM2021-12-24T07:16:28+5:302021-12-24T07:17:18+5:30

लस घेतलेली नाही, त्यांची प्रकृती गंभीर होऊन रुग्णालयात दाखल करावे लागण्याचा मोठा धोका संभवतो, असे म्हटले जात आहे.

50 percent less lethal than omicron delta number of hospital admissions will decrease | ओमायक्रॉन डेल्टापेक्षा ५० टक्के कमी घातक; रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या घटणार

ओमायक्रॉन डेल्टापेक्षा ५० टक्के कमी घातक; रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या घटणार

Next

लंडन :ओमायक्रॉन हा आधीच्या डेल्टा किंवा इतर कोरोना विषाणूंपेक्षा ५० टक्के कमी घातक आहे. त्यामुळे पूर्वी कोरोना संसर्गाने जितके रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले होते, त्यापेक्षा ओमायक्रॉनमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या निम्म्याने घटणार आहे. 

लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजने केलेल्या पाहणीच्या निष्कर्षात म्हटले आहे की, ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णालयात एक दिवस किंवा त्याहून थोडा काळ उपचार केले तरी ते पुरेसे होणार आहेत. मात्र, ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांची प्रकृती गंभीर होऊन रुग्णालयात दाखल करावे लागण्याचा मोठा धोका संभवतो. प्रा. निल फर्ग्युसन यांनी सांगितले की, सध्या वापरण्यात येणाऱ्या लसींचा प्रभाव ओमायक्रॉनविरोधात किती टिकून राहातो यावरही आमचा अभ्यास सुरू आहे. नव्या विषाणूची संसर्गशक्ती डेल्टापेक्षा अधिक असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. 
एडिनबर्ग विद्यापीठाने केलेल्या स्वतंत्र पाहणीच्या निष्कर्षात म्हटले आहे की, डेल्टा विषाणूच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या संसर्गावेळी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत निम्म्याहून अधिक घट होईल; मात्र काही शास्त्रज्ञांना हे मत मान्य नाही.

चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिकमुळे लॉकडाऊन

- चीनमध्ये काही आठवड्यांनंतर हिवाळी ऑलिम्पिक होणार आहे. त्यावेळी कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार टाळण्यासाठी चीनच्या क्षिआन शहरात बुधवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले.

- त्यामुळे तेथील सुमारे १.३ कोटी लोकांना काही दिवस या निर्बंधांमध्ये राहावे लागणार आहे.

- प्रत्येक घरातील एका माणसाला दर दोन दिवसांनी आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात येईल.

इंग्लंडमध्ये नवे निर्बंध नाहीत

इंग्लंडमध्ये ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार झालेला असला तरी ख्रिसमसच्या कार्यक्रमांवर नवी बंधने न लादण्याचा निर्णय त्या देशाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी घेतला आहे. या कार्यक्रमांमध्ये मर्यादित संख्येने लोकांना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे.

६०% लोकांचे पूर्ण लसीकरण

देशात कोरोना विषाणूवरील लस घेण्यास पात्र असलेल्या लोकसंख्येपैकी ६० टक्क्यांचे पूर्ण लसीकरण झाले आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरुवारी ट्विटरवर म्हटले. या लसीकरणाबद्दल त्यांनी देशाचे अभिनंदन केले. जनतेचा सहभाग आणि आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी समरसून केलेल्या प्रयत्नांमुळे ६० टक्क्यांच्या वर पात्र लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे.
 

Web Title: 50 percent less lethal than omicron delta number of hospital admissions will decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.