५०० कोटींचा भ्रष्टाचार इम्रान खानवर प्रश्नांची सरबत्ती, अधिकारी गेले रावळपिंडी तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 05:52 AM2023-11-28T05:52:23+5:302023-11-28T05:52:30+5:30
Imran Khan: पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी तपास संस्थेने ५० अब्ज रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खान यांची कारागृहात चौकशी केली.
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी तपास संस्थेने ५० अब्ज रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खान यांची कारागृहात चौकशी केली.
नॅशनल अकाउंटॅबिलिटी ब्युरोचे (एनएबी) पथक रविवारी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या प्रमुखांची चौकशी करण्यासाठी अदियाला तुरुंगात आले होते. इम्रान खान (७१) विविध प्रकरणांत दि. २६ सप्टेंबरपासून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतील रावळपिंडीतील तुरुंगात आहेत. एनएबीच्या पथकाने त्यांची ५० अब्ज रुपयांच्या अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी केली. दोन तासांहून अधिक काळ ही चौकशी चालली.
न्यायालयीन कोठडी
पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने सोमवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. खान यांची पोलिस कोठडी वाढविण्याची एनएबीचीची विनंती न्यायालयाने फेटाळली. न्यायाधीश मोहंमद बशीर यांनी रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणाची सुनावणी केली.
काय आहे प्रकरण?
-अल-कादिर ट्रस्ट प्रकरण १९० दशलक्ष पौंडाच्या (सुमारे ५० अब्ज रुपये) रकमेशी संबंधित आहे.
- ही रक्कम ब्रिटनच्या राष्ट्रीय गुन्हे संस्थेने पाकिस्तानी बांधकाम व्यावसायिकाकडून वसूल करून पाकिस्तानला पाठवली होती.
- इम्रान खान यांनी ही रक्कम राष्ट्रीय तिजोरीत जमा करण्याऐवजी ४५० अब्ज रुपयांच्या दंडाची अंशत: पूर्तता करण्यासाठी संबंधित व्यावसायिकाला वापरण्याची परवानगी दिली.
-त्या बदल्यात या बांधकाम व्यावसायिकाने खान व त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या ट्रस्टला सुमारे ५७ एकर जमीन भेट दिली होती.