पाक-चीनमध्ये ५१ करार

By admin | Published: April 21, 2015 12:28 AM2015-04-21T00:28:42+5:302015-04-21T00:28:42+5:30

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग पाकिस्तानच्या पहिल्या भेटीत सार्वकालिक मित्र असणाऱ्या पाकिस्तानशी ५१ करार केले असून त्यात

51 agreement in Pak-China | पाक-चीनमध्ये ५१ करार

पाक-चीनमध्ये ५१ करार

Next

इस्लामाबाद : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग पाकिस्तानच्या पहिल्या भेटीत सार्वकालिक मित्र असणाऱ्या पाकिस्तानशी ५१ करार केले असून त्यात महत्त्वाचा असा अब्जावधी डॉलरचा आर्थिक कॉरिडॉरचा करारही आहे. या कराराचा मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार असल्याने या भागात भारताच्या शेजारी चीनचा प्रभाव वाढणार आहे.
जिनपिंग यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असून भारताच्या दृष्टीनेही यास सामरिक महत्त्व आहे. यामुळे हिंदी महासागरात ड्रॅगनचा प्रभाव वाढण्यास मदत होणार आहे.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी ३ हजार कि.मी. लांबीच्या पाक- चीन आर्थिक कॉरिडॉरचे औपचारिक उद्घाटन केले. हा महत्त्वाचा कॉरिडॉर म्हणजे पाक व चीन या दोन देशातील जवळीक वाढविणारा करार आहे. १९७९ साली चीनने पाकला जोडणारा काराकोरम हायवे बांधला. त्यानंतरचा हा सर्वात मोठा प्रकल्प असून, यामुळे चीन व पाकिस्तान यांच्यातील अंतर कमी होणार आहे. चीनकडून ऊर्जा उत्पादनासाठी साहित्य आयात करणे पाकला यामुळे सोपे जाणार आहे.
या कॉरिडॉरने पाकिस्तानचा अविकसित पश्चिम भाग ग्वदार या चीनच्या मदतीने विकसित करण्यात आलेल्या बंदराशी जोडला जाणार आहे. यासाठी लागणारे रस्ते पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार असून, रस्ता, रेल्वे व व्यापारी क्षेत्र यांचे मोठे जाळे उभारले जाणार आहे. पहिला टप्पा ऊर्जा निर्मितीचा असून, तो येत्या तीन वर्षात पूर्ण होईल. त्यानंतर १०,४०० मेगावॅट वीज तयार होईल व चीनला हिंदी महासागरात व त्यापुढे थेट प्रवेश मिळेल.
शी जिनपिंग व त्यांची पत्नी पेंग लियून यांचे रावळपिंडीच्या नूर खान विमानतळावर आगमन झाले. पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन, पंतप्रधान नवाज शरीफ, लष्करप्रमुख राहिल शरीफ मंत्रिमंडळाचे सदस्य असा फौजफाटा चीनच्या अध्यक्षांच्या स्वागतासाठी उपस्थित होता. विमानतळावर शी यांच्या सन्मानार्थ २१ तोफांची सलामी देण्यात आली. शी दाम्पत्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. पाक अध्यक्ष हुसेन यांनी दिलेल्या सन्मानार्थ मेजवानीला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित राहतील. शी यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार निशान-ए- पाकिस्तान देऊन गौरविले जाणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 51 agreement in Pak-China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.