चीन विरोधात तब्बल 51 देश एकवटले, UN मध्ये ड्रॅगनला घेरलं; काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 04:35 PM2023-10-20T16:35:29+5:302023-10-20T16:36:18+5:30
मात्र, या देशांच्या यादीत भारताचे नाव नाही.
चीनमध्ये उइगर मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संयुक्त राष्ट्रात 51 देशांनी चीन विरोधातील एका संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केल्याचे वृत्त आहे. मात्र, या देशांच्या यादीत भारताचे नाव नाही. गेल्या वर्षी आलेल्या यूएनच्या एका अहवालातही शिनजियांग भागात उइगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराचा उल्लेख करण्यात आला आहे.
न्यूज-18 च्या एका वृत्तानुसार, संबंधित निवेदनावर अल्बेनिया, एंडोरा, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, कॅनडा, क्रोएशिया, झेकिया, डेन्मार्क, एस्टोनिया, इस्वातिनी, फिजी, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्वाटेमाला, आइसलँड, आयर्लंड, इस्रायल, इटली, जपान, लात्विया, लायबेरिया, लिकटेंस्टाईन लिथुआनिया, लक्झेंबर्ग, मोल्दोव्हा, मोनॅको, मॉन्टेनेग्रो, नौरू, नेदरलँड या देशांच्या नावांचा समावेश आहे.
यांच्याशिवाय, उत्तर मॅसेडोनिया, न्यूझीलंड, नॉर्वे, पलाऊ, पॅराग्वे, पोलंड, पोर्तुगाल, मार्शल बेटे प्रजासत्ताक, रोमानिया, सॅन मारिनो, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुवालू, युक्रेन, अमेरिका आणि ब्रिटेननेही सयुंक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) तिसऱ्या समितीत निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.
संबंधित निवेदनात म्हण्यात आले आहे की, 'या उल्लंघनात मनमानी पद्धतीने ताब्यात घेणे, जबरदस्तीने मजूरी करायला लावणे, पाळत ठेवणे, लोकसंख्या नियंत्रणाचे सक्तीचे उपाय, मुलांना कुटुंबापासून दूर करणे, लोक गायब होणे आणि मानसिक, शारीरिक तथा लैंगिक अत्याचार आदींचा समावेश आहे. शिनजियांग चीनच्या उत्तरेला आहे. याच्या सीमा रशिया, पाकिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांना लागून आहेत. चीनमधील गृहयुद्धातील विजयानंतर कम्युनिस्ट पक्षाने या भागावर नियंत्रण मिळवले होते.