पाकच्या तुरुंगांमध्ये ५३७ भारतीय कैदी; ४८३ मच्छीमारांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 05:45 AM2019-01-02T05:45:55+5:302019-01-02T05:46:15+5:30
देशातील तुरुंगात असलेल्या ५३७ भारतीय कैद्यांची एक यादी पाकिस्तानने भारताला सोपविली आहे. द्विपक्षीय संबंधाच्या करारांतर्गत पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे.
इस्लामाबाद : देशातील तुरुंगात असलेल्या ५३७ भारतीय कैद्यांची एक यादी पाकिस्तानने भारताला सोपविली आहे. द्विपक्षीय संबंधाच्या करारांतर्गत पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या कैद्यांमध्ये ४८३ मच्छीमार आणि ५४ अन्य भारतीय नागरिक आहेत.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तान सरकारने इस्लामाबादस्थित भारताच्या उच्चायुक्तांना मंगळवारी ५३७ भारतीय कैद्यांची यादी सोपविली आहे. भारत आणि पािकस्तान यांच्यात २१ मे २००८ रोजी झालेल्या करारानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे.
या करारानुसार, दोन्ही देशांच्या ताब्यात असलेल्या कैद्यांची यादी एका वर्षात दोनदा म्हणजे १ जानेवारी आणि १ जुलै रोजी एकमेकांना देण्यात यावी. या करारानुसार भारत सरकारही आपल्या देशातील तुरुंगात असलेल्या पाकिस्तानी कैद्यांची यादी नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना लगेचच सोपविणार आहे.
दोन्ही देशांमध्ये तणाव असला तरी सातत्याने दोन्ही देशांकडून कैद्यांची यादी सोपविण्याची परंपरा सुरू
आहे. (वृत्तसंस्था)
अणुकेंद्रांची दिली माहिती
पाकिस्तान सरकारने त्या देशात असलेल्या सर्व अणुकेंद्रांची माहितीही भारत सरकारकडे सोपविली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या करारानुसार अणुकेंद्रांवरील हल्ल्यांना निर्बंध घालण्यासाठी ही माहिती सादर केली आहे. दोन्ही देशांदरम्यान हा करार ३१ डिसेंबर १९८८ रोजी झाला होता. नवी दिल्लीत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय अणुकेंद्रांची यादी पाकिस्तानी उच्चायुक्तांना सोपविली आहे. भारतातर्फेही अशीच माहिती पाकिस्तानला देण्यात येणार आहे.