कोरोना पुन्हा पसरतोय? सिंगापूरमध्ये ५६ हजार रुग्ण आढळले; मास्क घालण्याचे केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 10:14 AM2023-12-16T10:14:32+5:302023-12-16T10:15:29+5:30
Coronavirus News: सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
Coronavirus News: संपूर्ण जगात हाहाःकार माजवणाऱ्या कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या तडाख्यातून आत्ता कुठे जग बऱ्यापैकी सावरल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, यातच आता जगातील काही देशांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. सिंगापूर येथे ५६ हजार कोरोना रुग्ण आढळून आल्याची माहिती तेथील आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरोनाने पुन्हा एकदा दहशत पसरवण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाची प्रकरणे ५६ हजारांच्या पुढे गेली आहेत. हे आकडे गेल्या आठवड्यातील आहेत. त्यापूर्वी हा आकडा ३२ हजार होता. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने १९ डिसेंबरपासून दररोज कोरोना अपडेट्स जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दररोज सरासरी ३५० रुग्ण उपचारासाठी दाखल
सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज सरासरी २२५ ते ३५० च्या घरात आहे. यापैकी सरासरी ४ ते ९ रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील बहुतेक रुग्ण कोरोना व्हेरिएंट JN.1 ने संक्रमित आहेत. जो BA.2.86 शी संबंधित आहे. आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये असे दिसून आले आहे की, कोरोनाचा हा व्हेरिएंट फारसा प्रसारित होत नाही. मात्र, यामुळे एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाला याची लागण होऊ शकते.
दरम्यान, भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. मात्र, सध्या काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. शुक्रवारी देशात कोरोनाचे ३१२ नवीन रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी २८० केरळमधील आहेत. ज्या रुग्णांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे, त्यांची लक्षणे फारशी गंभीर नाहीत. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात १७,६०५ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या.