Coronavirus : अमेरिकेत कोरोनाचे एकाच दिवसात ५.८० लाख रुग्ण; संसर्गाचा विळखा, लहान मुलांमध्येही प्रसार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 05:47 AM2022-01-01T05:47:06+5:302022-01-01T05:49:43+5:30
Coronavirus : ब्रिटन,युरोपातील देश, ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी ओमायक्राॅनच्या प्रसारामुळे कोरोना साथीचा धोका आणखी वाढला आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे ५ लाख ८० हजार नवे रुग्ण सापडले. तिथे एकाच दिवसात आढळलेली नव्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. तसेच कोरोनाची बाधा झालेल्या लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. ही स्थिती अतिशय चिंताजनक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. ब्रिटन,युरोपातील देश, ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी ओमायक्राॅनच्या प्रसारामुळे कोरोना साथीचा धोका आणखी वाढला आहे.
ओमायक्रॉनने जगाला घातलेला विळखा अधिकाधिक घट्ट होत आहे. अमेरिकेत कोरोनाने माजविलेला हाहाकार कमी होण्याऐवजी वाढला आहे. २२ ते २८ डिसेंबर या आठवडाभरात दररोज सरासरी ३७८ मुलांना कोरोना बाधेमुळे रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात कोरोना संसर्गामुळे दररोज ३४२ मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. ओमायक्रॉनमुळे अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होण्याची भीती आहे. अमेरिकेतील १८ राज्यांमध्ये विक्रमी आकडा नोंदविण्यात आला आहे.
फ्रान्समध्ये त्सुनामी
फ्रान्समध्ये दररोज २ लाख नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. युरोपातील कोणत्याही देशापेक्षा फ्रान्समध्ये दररोज सर्वाधिक रुग्ण आढळत असून दर सेकंदाला दोन फ्रेंच नागरिक कोरोनाबाधित होतात.
ब्रिटनची बिकट स्थिती
ब्रिटनमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे १ लाख ८९ हजार १२३ रुग्ण सापडले आहेत. त्या देशातील बहुसंख्य लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. ओमायक्राॅनच्या वेगवान प्रसारामुळे ब्रिटनमधील स्थिती बिकट झाली आहे.
स्पेनमध्ये दररोज १ लाख रुग्ण
स्पेनमध्ये दररोज १ लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. ओमायक्रॉनमुळे तिथे संसर्ग इतक्या वेगाने पसरत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. स्पेनमधील लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस देण्यात आले होते. तेथील ज्येष्ठ नागरिकांपैकी ८० टक्क्यांहून अधिक जणांना याआधीच बूस्टर डोस देण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेत रात्रीची संचारबंदी रद्द
दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनच्या लाटेने कळस गाठून ती आता उतरणीला लागली आहे. त्यामुळे आता त्या देशात रात्रीची संचारबंदी उठविण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना साथीची चौथी लाट आली आहे. ओमायक्रॉनचा विषाणू सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेतच आढळून आला होता.