भारतासह पाच देशांत ५९% दहशतवादी हल्ले, अमेरिकेचा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 04:35 AM2018-09-21T04:35:52+5:302018-09-21T04:36:09+5:30
जगभरात २०१७ साली झालेल्या एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी ५९ टक्के हल्ले हे आशियातील भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, फिलिपाईन्स या पाच देशांमध्ये झाले.
वॉशिंग्टन : जगभरात २०१७ साली झालेल्या एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी ५९ टक्के हल्ले हे आशियातील भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, फिलिपाईन्स या पाच देशांमध्ये झाले. मात्र, २०१७ मध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले असून, त्यामुळे हल्ल्यांतील बळींचे प्रमाणही घटले आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या दहशतवादविरोधी विभागाने गेल्या वर्षी जगभरात झालेल्या दहशतवादी कारवायांसंदर्भातअहवाल तयार केला आहे. त्या विभागाचे प्रवक्ते नाथन सॅलेस यांनी सांगितले की, २०१७ मध्ये जगातील १०० देशांमध्ये दहशतवादी हल्ले झाले. या हल्ल्यांतील ७० टक्के बळी हे अफगाणिस्तान, इराक, नायजेरिया, सोमालिया, सिरिया या पाच देशांमध्ये गेले आहेत. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी अमेरिका व तिच्या मित्र राष्ट्रांनी लढा सुरू ठेवला असला तरी इसिस, अल कायदा व त्यांच्याशी संलग्न गट, संघटना यांचा पूर्णपणे नायनाट करणे शक्य झालेले नाही.
इसिसपासून प्रेरणा घेऊन; पण कधीही सिरिया किंवा इराकमध्ये न जाताही विविध ठिकाणचे तरुण दहशतवादाकडे वळत आहेत. बर्लिन, बार्सिलोना, लंडन, मारावी, न्यूयॉर्क अशा अनेक ठिकाणी अशी उदाहरणे २०१७ साली पाहायला मिळाली, असे अहवाल म्हणतो. दहशतवादाविरोधात कठोर कारवाईबद्दल भारताची अमेरिकेने प्रशंसा केली. दहशतवादी पाकिस्तानी भूमीचा वापर करून भारतात हल्ले करीत आहेत. त्यांना रोखण्यासाठी भारताने अमेरिका व समविचारी देशांची मदत घेतली आहे. भारतातील नक्षलग्रस्त भाग, जम्मू-काश्मीर व ईशान्येकडील राज्यांत दहशतवादी कारवाया सुरूच असतात, असा उल्लेख आहे. (वृत्तसंस्था)
>भारतीय उपखंडाला धोका
पाकिस्तानमधून घातपाती कारवाया करणाऱ्या हक्कानी नेटवर्क, अफगाणिस्तानी तालिबान, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद आदी दहशतवादी संघटनांचा बीमोड करण्यासाठी तेथील सरकार कठोर कारवाई करीत नसल्याबद्दल अहवालात नाराजी व्यक्त करीत, या संघटनांपासून भारतीय उपखंडाला मोठा धोका असल्याचेही अहवालात म्हटले आहे.