वन्यजीवांच्या संख्येत ६० टक्के घट; सजीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 04:46 AM2018-10-31T04:46:43+5:302018-10-31T07:00:25+5:30
मानवाकडून होणाऱ्या नैसर्गिक साधनांच्या अनिर्बंध लुटीमुळे वन्य सजीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात
पॅरिस : मानवाकडून होणाऱ्या नैसर्गिक साधनांच्या अनिर्बंध लुटीमुळे वन्य सजीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे, सजीवांच्या असंख्य प्रजाती अल्पावधीत विनष्ट होण्याचा नवा विनाशकारी कालखंड सुरूझाला आहे आणि मानवाचा वाढता हव्यास पूर्ण करण्याची पृथ्वीची क्षमता संपत आली आहे, असा भयसूचक इशारा निसर्गरक्षणासाठी झटणाऱ्या ‘वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड’ (डब्ल्यूडब्ल्यू एफ) या जागतिक स्वयंसेवी संस्थेने दिला आहे.
जगभरात १६,७०० हून अधिक ठिकाणी आढळणाºया सजीवांच्या चार हजारांहून अधिक प्रजातींचे निरंतर सर्वेक्षण ही संस्था करीत असते. त्याच्या आधारे सजीवसृष्टीच्या स्थितीचा आढावा घेणारा ‘लिव्हिंग प्लॅनेट’ हा अहवाल संस्थेने प्रसिद्ध केला. त्यानुसार १९७० ते २०१४ या ४४ वर्षांच्या काळात मानवाकडून निसर्गावर केल्या जात असलेल्या अत्याचारांमुळे मासे, पक्षी, जलचर, सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी यासारख्या पाठीचे हाड असलेल्या सजीवांच्या ६० टक्के प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत.
अहवालानुसार याच काळात गोड्या पाण्यातील जलचरांची संख्या याहूनही जास्त म्हणजे ८० टक्क्यांनी घटली. प्रादेशिक तुलना केली तर याचा सर्वाधिक फटका लॅटिन अमेरिका क्षेत्रास बसला. तेथील वन्यजीवांची संख्या ९० टक्क्यांनी रोडावली. गेल्या ५० लाख वर्षांत पृथ्वीवरील सजीवसृष्टी अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर विनष्ट होण्याचे (मास एक्स्टिंग्शन) पाच कालखंड होऊन गेले. आता सहाव्या कालखंडाकडे वाटचाल सुरू असल्याचे संकेत या सर्वेक्षणातून मिळवलेल्या माहितीच्या विश्लेषणातून मिळतात, असेही ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’ने म्हटले आहे.
अहवाल म्हणतो की, विविध प्रजातींच्या विनष्टतेची स्थिती निरनिराळी असली तरी प्रजाती नष्ट होण्याचे सध्याचे प्रमाण काहीशे वर्षांपूर्वी होते त्याहून ते १०० ते एक हजार पटीने वाढले आहे. या काळात माणसाने आपल्या गरजा भागविण्यासाठी पृथ्वीची बेसुमार ओरबाडणूक सुरू केली व त्यामुळे अन्य सजीवांचे जगणे मुश्किल झाले.
हा अहवाल तयार करणाºया ५९ वैज्ञानिकांपैकी पियरे व्हिस्कोंती म्हणाले की, ही आकडेवारी भयावह आहे. संख्या कमी होत असेल तर ती घसरण रोखता येऊ शकते; पण एकदा विनष्ट झालेली प्रजाती पुनरुज्जीवित करता येत नाही. प्रवाळद्वीपांच्या बाबतीत परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. २५ टक्के समुद्रीजीवांचे जीवन प्रवाळद्वीपांवर अवलंबून असते; परंतु सागरांमध्ये पाठोपाठ आलेल्या उष्णतेच्या लाटांनी निम्मीअधिक प्रवाळद्वीपे याआधीच नष्ट झाली आहेत.
वन्य जीवांचा वाटा फक्त ४ टक्के
८० पानांच्या अहवालात असेही नमूद केले आहे की, सर्व सजीवसृष्टीचा वजनाच्या वा ‘बायोमास’च्या दृष्टीने विचार केला तर आज यात वन्यजीवांचा वाटा फक्त चार टक्के राहिला आहे. बाकीचा हिस्सा मानवाचा (३६ टक्के) आणि पाळीव पशुधनाचा (६० टक्के) आहे. या प्रमाणाच्या उतरंडीला बहुधा १० हजार वर्षांपूर्वी सुरुवात झाली असावी.
...तर स्थिती आणखी बिघडेल
परिस्थिती खरेच खूप वाईट आहे आणि ती आणखी वाईट होत चालली आहे, तरीही नेमके काय आणि कशामुळे होत आहे, याची आपल्याला माहिती आहे, हे त्यातल्या त्यात चांगले आहे. हे थांबविण्यासाठी आपण काहीच प्रयत्न केले नसते तर परिस्थिती याहूनही खराब असती.
-मार्को लॅम्बेर्तिनी, महासंचालक, डब्ल्यूडब्ल्यूएफ